कोल्हापूरकरांचा विजय! माधुरी हत्तीणी नांदणी मठात परत येणार?

On: August 7, 2025 11:22 AM
Madhuri Elephant News
---Advertisement---

Madhuri Elephant News | अखेर कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश मिळालं असून, अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेली हत्ती माधुरी पुन्हा तिच्या मूळ ठिकाणी नांदणी मठात परतणार आहे. वनतारा संस्थेचे सीईओ विहान करणी यांनी याबाबत अधिकृत आश्वासन दिलं असून, माधुरीसाठी नांदणी परिसरात नवीन घर आणि पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे.

कोल्हापुरातील जैन समाज, नांदणी मठ, स्थानिक नागरिक आणि हत्तीप्रेमी यांचा दबाव अखेर फळाला आला असून, वनताराच्या वतीने कोल्हापूरकरांची माफी मागण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात माधुरीच्या जीवाच्या सुरक्षिततेचा आणि तिच्या भावनिक बांधिलकीचा विचार करण्यात आला असल्याचेही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

वनताराचे CEO म्हणाले – ‘हा विजय माधुरीचा आहे!’ :

नांदणी मठाच्या महंतांसोबत झालेल्या बैठकीत बोलताना विहान करणी म्हणाले, “हा विषय प्रतिष्ठेचा नव्हे तर माधुरीच्या जीवाचा प्रश्न आहे. इथे हर-जीत नाही, इथे माधुरीचाच विजय आहे.” त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “माधुरीला वनतारामध्ये चांगली जागा मिळाली होती, मात्र नांदणी मठातही तिला प्रेम, काळजी आणि सुरक्षितता मिळेल याची खात्री आहे.” (Madhuri Elephant News)

या बैठकीत माधुरीसाठी नांदणी परिसरात आधुनिक सुविधांसह पालघर (Elephant Shelter) आणि पुनर्वसन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. हे केंद्र नांदणी मठाच्या मालकीच्या जमिनीत उभारण्यात येणार आहे.

Madhuri Elephant News | महंतांचं प्रतिपादन – सरकार आणि समाजाच्या सहकार्याने निर्णय :

नांदणी मठाचे महंत म्हणाले, “राज्य सरकार, वनतारा आणि मठ यांच्या संयुक्त निर्णयानुसार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. माधुरीच्या पुनर्वसनासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा नांदणी मठात उभारल्या जातील, यावर सर्वांचं एकमत झालं आहे.”

माधुरीला वनतारामध्ये नेण्यात आल्यानंतर कोल्हापुरात संतापाचा भडका उडाला होता. विविध संघटनांनी आंदोलनं केली, भावनिक प्रतिक्रिया उमटल्या आणि सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर विरोध नोंदवण्यात आला. कोल्हापूरच्या जनतेचा आवाज अखेर सरकारपर्यंत पोहोचला, आणि त्यानंतरच ही सकारात्मक बैठक पार पडली. (Madhuri Elephant News)

वनतारा व्यवस्थापनानेही यावेळी कोल्हापूरकरांची आणि जैन धर्मीयांची माफी मागितली असून, त्यांच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असं स्पष्ट केलं.

News Title: Madhuri the Elephant to Return to Nandani Math: Kolhapur Citizens’ Battle Succeeds

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now