LPG | गृहिणींसह सर्वसामान्य कुटुंबांसाठी मोठी चिंता निर्माण करणारी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ जाहीर केली असून, यासोबत उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala Yojana) लाभार्थींनाही दरवाढीचा फटका बसणार आहे. नव्या दरांनुसार आता सिलेंडर घेण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
एलपीजी सिलेंडर आता ८५३ रूपयांना
मंगळवार, ८ एप्रिलपासून (8 April) देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याआधी एलपीजीचा सिलेंडर ८०३ रूपयांना मिळत होता. मात्र, आता तोच सिलेंडर ग्राहकांना ८५३ रुपयांना उपलब्ध होणार आहे. ही माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कातही वाढ केली होती. त्यानंतर एलपीजीच्या दरात झालेली वाढ ही सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ देणारी आहे. या दरवाढीमुळे आता अनेक घरांतील बजेट बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उज्ज्वला योजनेतील महिलांनाही दिला धक्का
दरवाढ केवळ एलपीजीपुरती मर्यादित न राहता, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींवरही याचा परिणाम झाला आहे. योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानित गॅस सिलेंडरची किंमत आता ५०० रूपयांऐवजी थेट ५५० रूपये इतकी झाली आहे. गरीब आणि गरजू महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती, परंतु दरवाढीमुळे त्यांच्यासाठीही अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत, सणासुदीच्या काळात किंवा महागाईच्या पार्श्वभूमीवर झालेली ही दरवाढ अनेक कुटुंबांवर आर्थिक ताण आणू शकते. सरकारकडून या दरवाढीबाबत कोणतीही दिलासा योजना जाहीर करण्यात आलेली नाही.
Title: LPG & Ujjwala Cylinder Price Hiked






