LPG Gas | इराण-इस्रायल युद्धाचा थेट फटका आता सर्वसामान्यांच्या घरापर्यंत आणि स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे. इंधनटंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने उद्योग आणि हॉटेल्सचा गॅस पुरवठा थांबवून घरगुती ग्राहकांना प्राधान्य देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यात एलपीजी सिलेंडरची टंचाई भासत असल्याचं दृश्य पाहायला मिळालं. बुकिंग असूनही ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे पुणेकरांनी गॅस एजन्सीसमोर लांबच लांब रांगा लावलेल्या पाहायला मिळाल्या.
बुकिंग करूनही पदरी निराशाच
शहरातील बहुतांश गॅस एजन्सीजबाहेर सकाळपासूनच ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, ग्राहकांनी ऑनलाइन ॲपवरून किंवा फोनवरून बुकिंग करूनही त्यांना वेळेवर सिलिंडर मिळत नाहीये. चौकशी केल्यावर एजन्सीकडून ‘सध्या स्टॉक संपला आहे’ किंवा ‘मागूनच पुरवठा उशिरा होत आहे’ अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. गॅस संपल्याने ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत गृहिणींचे स्वयंपाकघराचे बजेट आणि रोजचे नियोजन पूर्णपणे कोलमडून पडले आहे.
ई-केवायसी (e-KYC) ठरतेय मोठी डोकेदुखी
एकीकडे गॅस मिळत नाही, तर दुसरीकडे शासनाने गॅस जोडणीसाठी ‘ई-केवायसी’ अनिवार्य केल्याने ग्राहकांच्या मनस्तापात अधिकच भर पडली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना प्रत्यक्ष गॅस एजन्सीच्या कार्यालयात जावे लागत आहे. मात्र तिथे गेल्यावर ‘सर्व्हर डाऊन’ असणे किंवा मशीनवर अंगठ्याचे ठसे (Biometric Fingerprints) न जुळणे, अशा तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नोकरी-व्यवसाय सांभाळून तासनतास रांगेत उभे राहूनही काम होत नसल्याने पुणेकर आता तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय घडामोडींचाही या परिस्थितीवर परिणाम होत असल्याची चर्चा आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कमर्शियल गॅससोबतच घरगुती गॅसच्या पुरवठ्यावरही दबाव वाढल्याची शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र याबाबत अधिकृत पातळीवर स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.
गॅस वितरण कंपन्यांकडून परिस्थिती लवकरच सुरळीत होईल असा दावा करण्यात येत आहे. पुरवठा साखळी व्यवस्थित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. तरीही, नागरिकांना वेळेवर गॅस मिळावा आणि एजन्सीवरील गर्दी कमी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.






