Lohagaon | पुणे (Pune) शहरातील कळस, धानोरी आणि लोहगाव या भागांमधील नागरिक विविध नागरी समस्यांनी त्रस्त झाले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात अखेर त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. सौ. पूजा धनंजय जाधव (Pooja Dhananjay Jadhav) यांच्या नेतृत्वाखाली पुणे मनपा आयुक्त नवलकिशोर राम (Navalkishor Ram) यांची गाडी अडवून थेट गाडीसमोर लोटांगण घालून प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
रस्ते, पाणी, कचरा: समस्यांनी नागरिक त्रस्त –
कळस, धानोरी आणि लोहगाव या तिन्ही भागांमध्ये नागरी समस्यांनी उग्र रूप धारण केले आहे. तब्बल १५ वर्षांपूर्वी, २००८ साली मंजूर झालेल्या डीपी प्लॅननुसार आखण्यात आलेल्या रस्त्यांची कामे आजही अपूर्ण आहेत, ज्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. या भागातील मुख्य रस्ते वगळता इतर सर्व अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
लोहगावमध्ये आंदोलन, आयुक्त म्हणाले नाटक करु नका#pune #म @DrDJadhavSpeaks @poojamorespeaks pic.twitter.com/AjpXuzCqft
— थोडक्यात (@thodkyaat) October 15, 2025
प्रशासनाकडून केली जाणारी डागडुजी तकलादू असल्याने समस्या कमी होण्याऐवजी वाढत आहे. यासोबतच, कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, दररोज किमान १०० ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत आहेत. साठे वस्ती, निंबाळकर नगर, मोझे नगर आणि पोरवाल रोड यांसारख्या परिसरात पाण्याची लाईन टाकूनही दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. डी. वाय. पाटील रस्त्यापासून लोहगावपर्यंत खोदलेला रस्ता महिनोंमहिने दुरुस्त न झाल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे.
आयुक्तांच्या गाडीसमोर घोषणाबाजी-
वारंवार निवेदने देऊनही प्रशासन दखल घेत नसल्याने अखेर धनंजय जाधव (Dhananjay Jadhav) आणि पूजा जाधव यांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले. आयुक्तांची गाडी अडवून “जागे व्हा, जागे व्हा, पुणे प्रशासन जागे व्हा!” आणि “झोपलेल्या पालिका प्रशासनाचा निषेध असो” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी, ‘मयूर किलबिल’मधील रहिवाशांच्या जीवाशी विकासक खेळत असतानाही प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला.
या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. जर आगामी काळात या प्रभागातील रस्ते, पाणी, कचरा आणि इतर नागरी प्रश्न तातडीने सोडवले नाहीत, तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पूजा धनंजय जाधव यांनी दिला आहे.
News Title – lohagaon Pune Civic Issues Protest Halts Commissioner






