Chetan Choudhari | पुण्यातील(Pune) लोहगड किल्ल्यावर(Lohagad Fort) घडलेल्या केतन अग्रवाल(Ketan Agrawal) हत्याकांडात तपासादरम्यान एकामागून एक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या प्रकरणातील आरोपी सिया गोयल(Siya Goyal) आणि चेतन चौधरी(Chetan Choudhari) यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस(Lonavala Rural Police) तपासातून समोर आली आहे. या कबुलीमुळे पोलिसांच्या तपासाला नवे धागेदोरे मिळाले असून हत्येपूर्वी आखण्यात आलेल्या संपूर्ण कटाचा उलगडा करण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.
तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत दोन्ही आरोपींनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा कट रचल्याचे समोर आले आहे. हत्येच्या दिवशी त्यांनी एका कॅफेमध्ये भेट घेतली होती. याच भेटीत केतनला ठार मारण्यासाठी अंतिम योजना निश्चित करण्यात आल्याचे तपासातून उघड झाले आहे. तसेच गेल्या सहा महिन्यांत सिया आणि चेतन यांच्यात तब्बल 2 हजार 4 वेळा दूरध्वनीवर संवाद झाल्याचेही समोर आले आहे. या सातत्यपूर्ण संपर्कामुळे दोघांमधील संबंध आणि गुन्ह्यातील सहभाग अधिक ठळकपणे अधोरेखित होत असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
लोहगडावर प्रवेश करतानाचा संशयास्पद प्रकार :
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, केतनच्या हत्येपूर्वी चेतन आणि सिया यांनी लोहगड किल्ल्यावर कोणत्या ठिकाणाहून त्याला खाली ढकलता येईल याचीही पाहणी केली होती. आरोपी चेतन किल्ल्यावर पोहोचला तेव्हा त्याने भर उन्हात अंगावर हुडी परिधान केली होती. त्याचबरोबर चेहऱ्यावर मास्क आणि कानावर हेडफोन्स घालून त्याने आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
यावेळी चेतनने प्रवेशासाठी आवश्यक तिकीटही घेतले नव्हते. किल्ल्यावरील सुरक्षारक्षकाने त्याला अडवून तिकीटाबाबत विचारणा केली असता, “मी परत येताना तिकीटाचे पैसे देतो,” असे सांगून तो पुढे गेला. मात्र परतीच्या वेळी त्याने कोणतेही शुल्क न भरता तेथून निघून गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या सर्व हालचालींमुळे हत्येचे नियोजन आधीपासूनच करण्यात आले होते, असा संशय अधिक बळकट झाला आहे.
Chetan Choudhari | केतनच्या वडिलांची कठोर शिक्षेची मागणी :
दरम्यान, मृत केतनचे वडील विशाल अग्रवाल(Vishal Agrawal) यांनी या प्रकरणाबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सांगितले की, फेब्रुवारी महिन्यात केतन आणि सिया यांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर 6 तारखेला चौघांचा बाली(Bali) दौरा नियोजित होता. मात्र केवळ केतनचाच पासपोर्ट चोरीला गेल्याने त्याला प्रवास रद्द करून विमानतळावरून परतावे लागले होते.
विशाल अग्रवाल यांनी आरोप केला की, चेतन दुचाकीवरून लोहगडावर पोहोचला आणि त्यानंतर तो व सिया एकत्र किल्ल्यावर गेले. तेथे केतनवर हल्ला करून त्याला दरीत फेकण्यात आले. त्यांनी पोलिसांच्या तपासाचे कौतुक करत स्थानिक ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल(Sandeep Singh Gill) यांच्या कामगिरीचे विशेष अभिनंदन केले. जर सियाला लग्न करायचे नव्हते, तर तिने थेट नकार द्यायला हवा होता, असे सांगत त्यांनी आरोपींना जलद न्यायालयीन प्रक्रियेद्वारे कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी समाजासमोर कठोर संदेश जाणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.






