Liquor Ban | महाराष्ट्र (Maharashtra) विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. 18 जून रोजी होणाऱ्या मतदान आणि 22 जूनच्या मतमोजणीपूर्वी नाशिक (Nashik) आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यांमध्ये दारुविक्रीवर तात्पुरती बंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत.
नाशिकमध्ये 16 जूनपासून निर्बंध लागू :
नाशिक विधानपरिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण आणि निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने मद्यविक्री बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, 16 जून रोजी दुपारी 4 वाजल्यापासून जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री केंद्रांवर निर्बंध लागू झाले आहेत.
ही बंदी 18 जून रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कायम राहणार आहे. तसेच 22 जून रोजी मतमोजणीच्या दिवशीही संपूर्ण जिल्ह्यात दारुविक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निवडणुकीत जिल्ह्यातील 623 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, मतदान निष्पक्ष आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
Liquor Ban | उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा :
जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, मद्यविक्री बंदीच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा (Maharashtra Prohibition Act) अंतर्गत कलम 54 आणि 58 नुसार कठोर कारवाई केली जाईल. निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उत्पादन शुल्क विभागाला विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातही विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित भागांमध्ये चार दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एस. कार्तिकेयन (S. Karthikeyan) यांनी जारी केले आहेत. निवडणूक प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष आणि शांततेत पार पडावी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






