Laxman Hake | ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर तुफान व्हायरल झाला असून त्यात त्यांनी माळी समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा केला जात आहे. या वक्तव्यामुळे माळी समाजात मोठी नाराजी व्यक्त होत आहे. या घटनेमुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, स्वतः लक्ष्मण हाके यांनी या व्हिडिओबाबत स्पष्टीकरण दिले असून तो व्हिडिओ एडिटेड असल्याचा दावा त्यांनी केला आहे. (Laxman Hake Viral Video)
काय आहे त्या व्हिडिओतील वक्तव्य? :
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत लक्ष्मण हाके (Laxman Hake) बोलताना दिसत आहेत. त्यात ते म्हणतात, “माळ्यांचं दुखणं एक आहे, ओबीसींचं नेतृत्व माळ्यांकडून धनगरांकडे चाललं आहे. ही त्यांची पोटशूळ.” या वक्तव्यावरून माळी समाजात अस्वस्थता पसरली असून हाके यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मात्र हा व्हिडिओ खरा की खोटा यावर अजूनही संभ्रम कायम आहे. व्हिडिओमध्ये पुढील काही भाग नीट ऐकू येत नसल्याने त्यातील आशय अधिक वादग्रस्त असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
या व्हिडिओबाबत प्रतिक्रिया देताना लक्ष्मण (Laxman Hake) हाके म्हणाले की, “हा व्हिडिओ माझाच आहे, पण त्यातील आवाज माझा नाही. माळी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचा प्रश्नच येत नाही. ओबीसी जातींमध्ये फुट पाडण्यासाठी आणि समाजात मतभेद निर्माण करण्यासाठी हा प्रकार करण्यात आला आहे. मी काही वेडा नाही की असं वक्तव्य करीन.” हाके यांनी पुढे सांगितले की, जरांगे यांच्याविरोधात आपण आंदोलन सुरू केले असतानाच हा व्हिडिओ समोर येतोय. त्यामुळे ही राजकीय कटकारस्थानाची खेळी असल्याचा आरोप त्यांनी केला.
Laxman Hake | नवनाथ वाघमारे यांची प्रतिक्रिया :
दरम्यान, या व्हिडिओवर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “सोशल मीडियावर आपण हा व्हिडिओ पाहिला आहे. माळी समाजाने नुकताच हाके यांचा सत्कार करून त्यांना सन्मान दिला. त्याच नेत्यांच्या तोंडून असे वक्तव्य येणे दुर्दैवी आहे. त्यांनी खरंच बोलले की नाही, हे महत्त्वाचे नाही. पण व्हिडिओत तरी ते बोलताना दिसत आहेत. त्यामुळे आता त्यावर हाके यांनीच स्पष्ट उत्तर द्यावे.”
लक्ष्मण हाके यांनी केलेल्या कथित वक्तव्यामुळे ओबीसी राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. माळी समाजात नाराजीची भावना व्यक्त होत असताना हाके यांच्या खुलाशामुळे या प्रकरणाला नवा रंग मिळाला आहे. हा व्हिडिओ एडिटेड असल्याचा त्यांचा दावा कितपत खरा आहे, हे तपासल्यानंतरच पुढे परिस्थिती स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या तरी हा वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.






