Latur Crime | लातूर (Latur) जिल्ह्यामध्ये विम्याच्या रकमेवर डल्ला मारण्यासाठी स्वतःच्याच हत्येचा बनाव रचणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कर्जबाजारी असल्यामुळे हतबल झालेल्या या व्यक्तीने एका निरपराध मजुराचा जीव घेऊन, अपघाताचा दिखावा निर्माण केला होता. मात्र, तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत आरोपीचा डाव उधळून लावला आहे.
कारमधील मृतदेहाचं रहस्य:
वानवाडा (Vanwada) पाटीजवळ एक चारचाकी गाडी पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत पोलिसांना सापडली होती. या वाहनामध्ये एका व्यक्तीचा कोळसा झालेला मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. तपासादरम्यान ही कार बळीराम राठोड (Baliram Rathod) यांच्या मालकीची असल्याचे समोर आले, पण घटनेच्या वेळी ती गाडी त्यांचे मेहुणे गणेश चव्हाण (Ganesh Chavan) वापरत होते. गणेश हे १३ डिसेंबरला रात्री कामाचे निमित्त सांगून घराबाहेर पडले होते आणि त्यानंतर त्यांचा पत्ता नव्हता.
गाडीत मिळालेल्या ब्रेसलेटवरून सुरुवातीला तो मृतदेह गणेशचाच असावा असा अंदाज वर्तवण्यात आला. परंतु, लातूर गुन्हे शाखेला या घटनेत काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आला. पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांची आणि मोबाईल लोकेशनची मदत घेतली असता, मृत घोषित केलेला गणेश प्रत्यक्षात जिवंत असल्याचे समोर आले. पोलिसांनी वेगाने हालचाली करत त्याला सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील विजयदुर्ग (Vijayduga) येथून ताब्यात घेतले आणि या संपूर्ण बनावाचा उलगडा झाला.
कर्जाचा डोंगर आणि खुनाचा प्लॅन:
गणेशने चौकशीत कबूल केले की, त्याच्यावर तब्बल ५७ लाख रुपयांचे कर्ज झाले होते. या आर्थिक संकटातुन बाहेर पडण्यासाठी त्याने तीन वर्षांपूर्वी काढलेल्या १ कोटी रुपयांच्या टर्म इन्शुरन्सचा (Term Insurance) आधार घेण्याचे ठरवले. स्वतःचा मृत्यू झाल्याचे भासवल्यास विम्याची रक्कम कुटुंबाला मिळेल आणि सर्व देणी मिटतील, असा त्याचा विचार होता. या योजनेसाठी त्याने एका निष्पाप व्यक्तीचा बळी देण्याचे क्रूर पाऊल उचलले.
गुन्ह्याच्या रात्री (Latur) गणेशला दारूच्या नशेत असलेला गोविंद यादव (Govind Yadav) हा मजूर भेटला. त्याला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गणेशने आपल्या कारमध्ये बसवले आणि एका निर्जन ठिकाणी नेले. यादव झोपेत असताना गणेशने त्याला चालक शेजारील सीटवर बसवून सीटबेल्ट लावला आणि गाडीला आग लावून दिली. त्यानंतर त्याने तिथून पळ काढला आणि कोल्हापूर (Kolhapur) मार्गे कोकणात आश्रय घेतला. मात्र, गुन्हे शाखेने केवळ २४ तासांत या फिल्मी कटाचा शेवट केला.
News Title- Latur Murder Insurance Fraud Case Exposed






