Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) या योजनेच्या लाभाबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण बदल केला आहे. आता इतर शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेचा पूर्ण लाभ मिळणार नाही. विशेषतः ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ (Namo Shetkari Mahasanman Nidhi) योजनेच्या लाभार्थी महिलांना आता ‘लाडकी बहीण’ योजनेतून केवळ ५०० रुपये प्रति महिना मिळतील.
शासकीय योजनांच्या दुहेरी लाभावर मर्यादा-
जुलै २०२४ पासून सुरू झालेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यास सुरुवात झाली होती. निवडणुकीपूर्वी ही रक्कम २१०० रुपये करण्याची घोषणाही करण्यात आली होती, जी अद्याप लागू झालेली नाही. सुरुवातीला अनेक महिलांनी (Ladki Bahin Yojana) अर्ज केले व त्यांना लाभही मिळू लागला. मात्र, नंतर सरकारने कर भरणारे आणि चारचाकी वाहन असलेल्या महिलांना यातून वगळले.
आता सरकारने आणखी एक पाऊल उचलत, कोणत्याही शासकीय योजनेचा दुहेरी लाभ घेता येणार नाही, असे धोरण निश्चित केले आहे. यामुळे, ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेतून वर्षाला १२ हजार रुपये (म्हणजे महिन्याला १००० रुपये) मिळणाऱ्या महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेतील दीड हजार रुपयांऐवजी केवळ ५०० रुपयांचा फरकच दिला जाणार आहे.
अर्ज पडताळणी अंतिम टप्प्यात-
या नवीन धोरणानुसार, प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी काही दिवसांपूर्वी ‘एक्स’वर (X) पोस्ट करून याबाबत माहिती दिली होती. २८ जून २०२४ आणि ३ जुलै २०२४ च्या शासन निर्णयानुसार (Government Resolutions), इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांनाच ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पूर्ण १५०० रुपये सन्मान निधी दिला जात आहे.
यानुसार, ‘नमो शेतकरी’ योजनेचा लाभ घेणाऱ्या ७,७४,१४८ महिलांना केवळ ५०० रुपये सन्मान निधी वितरित केला जात असल्याचे (Ladki Bahin Yojana) त्यांनी स्पष्ट केले होते. तसेच, संजय गांधी निराधार योजनेचा (Sanjay Gandhi Niradhar Yojana) लाभ घेणाऱ्या महिलाही या योजनेतून बाहेर पडत असून, अनेकजणी स्वतःहून महिला व बालविकास विभागाकडे लाभ नको म्हणून अर्ज करत आहेत.






