Ladki Bahin Yojana | महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत मे महिन्याचा रखडलेला हप्ता अखेर वितरित होण्यास सुरुवात झाली आहे. जून महिन्याचा अर्धा कालावधी उलटल्यानंतरही अनुदान न मिळाल्याने लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता पात्र महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेद्वारे रक्कम जमा होऊ लागली आहे.
15 जूनपासून खात्यात पैसे जमा :
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांचा सन्मान निधी दिला जातो. मे महिन्याचा हप्ता उशिरा मिळाल्याने अनेक लाभार्थी महिलांना पैसे कधी जमा होणार, याची प्रतीक्षा होती. अखेर 15 जूनच्या सायंकाळपासून बँक खात्यांमध्ये निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (Ladki Bahin Yojana Update)
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत सर्व पात्र महिलांच्या खात्यात मे महिन्याची रक्कम जमा होणार आहे. यापूर्वी सरकारने मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे वितरित केले होते. यावेळी केवळ मे महिन्याचा हप्ता लाभार्थींना दिला जात आहे.
Ladki Bahin Yojana | ई-केवायसी पडताळणीत 80 लाख महिला अपात्र :
योजनेच्या लाभार्थींची पात्रता निश्चित करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रियेद्वारे पडताळणी करण्यात आली होती. या पडताळणीदरम्यान अनेक अर्जदार महिला योजनेच्या निकषांमध्ये बसत नसल्याचे आढळून आले. तसेच आवश्यक कागदपत्रांची अपूर्णता आणि विविध तांत्रिक कारणांमुळे मोठ्या संख्येने अर्ज प्रलंबित राहिले.
या प्रक्रियेनंतर सुमारे 80 लाख महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता न मिळालेल्या महिलांनी आपल्या बँक खात्याची स्थिती, ई-केवायसीची पूर्तता आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.






