Kunal Kamra | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केलेल्या विनोदावरून स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. मुंबईतील (Mumbai) ‘द हैबिटेट’ या ठिकाणी झालेल्या व्हिडिओ शूटिंगनंतर बीएमसीने (BMC) त्या इमारतीवर कारवाई करत अनधिकृत बांधकाम पाडले आहे. या पार्श्वभूमीवर कामराने नवीन व्हिडिओ शेअर करत शिवसेनेवर (Shiv Sena) टोला लगावला आहे.
इंस्टाग्रामवरील व्हिडिओमुळे राजकीय खळबळ
कुणाल कामरा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक विडंबनात्मक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ते “हम होंगे कंगाल एक दिन…” हे गाणं गायनाच्या माध्यमातून सादर करताना दिसतात. याच गाण्यात देशातील अंधश्रद्धा, दंगली, पोलिसी हस्तक्षेप, नथुराम आणि आसाराम यांच्या नावांचा उल्लेख करत त्यांनी विडंबन केलं आहे. या व्हिडिओत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ‘द हैबिटेट’मध्ये घातलेली तोडफोडही दाखवण्यात आली आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओमुळे आधीच वादात असलेले वातावरण अधिक चिघळले आहे. कामराने शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका करत, परिस्थितीवर उपरोधिक भाष्य केलं आहे. या प्रकारानंतर त्यांनी वकिलामार्फत मुंबई पोलिसांना पत्र पाठवून, आपली बाजू मांडण्यासाठी एक आठवड्याची मुदत मागितली आहे.
संसदेत कामराविरोधात मागणी-
एकनाथ शिंदे यांच्यावरील कामराच्या वक्तव्याचा मुद्दा मंगळवारी संसदेत उपस्थित करण्यात आला. शिवसेनेचे खासदार धैर्यशील संभाजीराव माने यांनी कुणाल कामराचे नाव न घेता सोशल मीडियावर अशा स्वरूपाची सामग्री प्रसारित करणाऱ्या मंचांवर बंदी घालण्याची मागणी केली. यामुळे संसदेतही या मुद्द्याचं पडसाद उमटले.
दरम्यान, ज्या ठिकाणी वादग्रस्त व्हिडिओ शूट करण्यात आला, त्या ‘द हैबिटेट’ इमारतीच्या अनधिकृत भागावर बीएमसीने कारवाई सुरू केली आहे. सोमवारी बीएमसीने या इमारतीच्या टेरेसवरील बेकायदेशीर बांधकाम पाडलं असून, मंगळवारीही ही कारवाई पुढे सुरू राहिली. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही कारवाई महापालिकेच्या नियमांनुसारच करण्यात येत आहे.
Title: Kunal Kamra Video Triggers BMC Action






