फक्त एका संधीची वाट; वैभव सूर्यवंशी आज मोडणार दिग्गज भारतीय फलंदाजांचे ‘हे’ ५ रेकॉर्ड्स?

On: June 26, 2026 2:12 PM
Vaibhav Sooryavanshi (2)
---Advertisement---

Vaibhav Sooryavanshi | भारताचा 15 वर्षीय युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी आज आयर्लंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण करण्याची शक्यता आहे. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाल्यास भारतीय क्रिकेट इतिहासात अनेक विक्रम नव्याने लिहिले जाऊ शकतात. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी वरिष्ठ संघात संधी मिळाल्यामुळे वैभव आधीच चर्चेत असून, आता मैदानावर उतरल्यास त्याच्याकडे सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि इशान किशन यांच्यासह अनेक दिग्गजांचे विक्रम मोडण्याची संधी असेल.

आयपीएलमधील दमदार कामगिरीनंतर वैभवची आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामुळे त्याच्या संभाव्य पदार्पणाकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. एकाच सामन्यात पाच वेगवेगळे विक्रम करण्याची संधी मिळाल्याने हा सामना त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

पदार्पणातच सचिन, इशान आणि अजिंक्यचे विक्रम धोक्यात :

भारतीय पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रम सध्या सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या नावावर आहे. त्यांनी 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 16 वर्षे 205 दिवसांचे असताना पदार्पण केले होते. वैभवला आज संधी मिळाल्यास तो हा तब्बल 37 वर्षे जुना विक्रम मोडत भारताचा सर्वात युवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरू शकतो.

याशिवाय पहिल्याच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम इशान किशनच्या नावावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या पदार्पणात त्याने चार षटकार लगावले होते. वैभवने पाच षटकार ठोकल्यास हा विक्रम त्याच्या नावावर जाईल. तसेच पदार्पणाच्या टी-20 सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा अजिंक्य रहाणेचा 61 धावांचा विक्रमही धोक्यात येऊ शकतो. वैभवने 62 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्यास तो नवा विक्रम प्रस्थापित करेल.

Vaibhav Sooryavanshi | रोहित शर्मालाही मागे टाकण्याची संधी :

आयर्लंडमध्ये टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर आहे. रोहितने आयरिश भूमीवर सलामीवीर म्हणून 97 धावा केल्या आहेत. वैभवने पदार्पणातच 98 धावा केल्यास तो हा विक्रमही आपल्या नावावर करू शकतो.

याशिवाय आयर्लंडमध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये आजपर्यंत कोणालाही पहिल्या सामन्यात धाव करता आलेली नाही. सिद्धार्थ कौल, उमरान मलिक, प्रसिद्ध कृष्णा आणि रिंकू सिंह या चौघांनाही हा टप्पा गाठता आला नव्हता. त्यामुळे वैभवने एक धाव जरी काढली तरी आयर्लंडच्या भूमीवर टी-20 पदार्पणात धाव करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरेल. त्यामुळे आजचा सामना वैभव सूर्यवंशीसाठी वैयक्तिक आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो.

News Title : Vaibhav Sooryavanshi Can Create History on Debut, May Break 5 Major Indian Cricket Records

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now