Karuna Sharma | राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्यातील वाद आता अधिक तीव्र झाला आहे. वांद्रे न्यायालयाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपयांची पोटगी द्यावी असा आदेश दिला आहे. मात्र, यावर प्रतिक्रिया देताना करुणा शर्मा यांनी मी तोंड उघडले तर धनंजयच नव्हे, तर पंकजा मुंडेंचेही मंत्रिपद जाईल असा थेट इशारा दिला आहे.
मी तुमची पत्नी आहे-
करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मी गेली 27 वर्षे धनंजय मुंडेंची पत्नी आहे. जर मला बोलायचेच असेल, तर मी कुठेही बोलेन, अगदी कॅबिनेटमध्ये येऊनही बोलेन. तुम्ही मला काहीही झाले तरी रस्त्यावर सोडू शकत नाही.
त्या पुढे म्हणाल्या, 1996 पासून काय-काय झालं ते मी उघड करणार. जर माझ्या मुलांचा माझ्याविरोधात वापर केला, तर मी पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडेंनी काय कटकारस्थान केले, हे सर्व सांगीन. माझं तोंड उघडलं तर पंकजा मुंडेंचंही मंत्रिपद जाईल
फुट टाका आणि राज्य करा-
करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी धनंजय मुंडेंच्या राजकीय धोरणांवरही निशाणा साधला. त्या म्हणाल्या, धनंजय मुंडेंना फुट टाका आणि राज्य करा ही सवय आहे. ते स्वतः काहीही बोलत नाहीत, पण माझ्या विरुद्ध माझ्याच मुलाला उभं करतात.
त्या पुढे म्हणाल्या, माझ्या मुलाला गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणाव आहे. जर त्याच्या आयुष्यात काही वाईट घडले, तर धनंजय मुंडे स्वतःला कधीही माफ करू शकणार नाहीत. वांद्रे कोर्टाने धनंजय मुंडेंना दरमहा 2 लाख रुपयांची पोटगी द्यावी असे आदेश दिल्यानंतर करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली, मी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल आभारी आहे. मात्र, आमची मागणी 15 लाखांची होती, त्यामुळे आम्ही या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहोत.
धनंजय मुंडेंना पक्षातून हाकलले पाहिजे
करुणा शर्मा यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आवाहन करत सांगितले, “जर महिलांबद्दल खरोखर सहानुभूती असेल, तर त्यांनी धनंजय मुंडेंना पक्षातून काढून टाकावे.
राजकीय वादाला आणखी तोंड फुटणार?
करुणा शर्मा यांच्या या तीव्र आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर आता भाजप आणि राष्ट्रवादी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






