“कराड चुकीचा स्पर्श करत होता तेव्हा धनंजय मुंडे स्वतः …”, करुणा शर्मांचा खळबळजनक खुलासा

On: February 6, 2025 8:35 PM
karuna sharma
---Advertisement---

Karuna Sharma | बीडमध्ये चर्चेत असलेल्या वाल्मिक कराडविरोधात नवे आरोप समोर आले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासात त्याचा खंडणीसह अनेक प्रकरणांमध्ये सहभाग स्पष्ट झाला आहे. आता, करुणा शर्मा यांनी त्याच्यावर गंभीर आरोप करत माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री धनंजय मुंडे उपस्थित असताना वाल्मिक कराडने आपल्याला चुकीचा स्पर्श केला आणि मारहाण केली असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.

वाल्मिक कराडवर मारहाणीचा आरोप-

वाल्मिक कराडच्या (Walmik Karad)  विरोधातील आरोपांची मालिका सुरूच असून करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनीही आपले मत मांडले आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याशी झालेल्या वादानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात कराडने त्यांना धक्काबुक्की केली आणि असभ्य वर्तन केल्याचा आरोप त्यांनी केला. इतकेच नव्हे तर, मारहाणीवेळी धनंजय मुंडे स्वतः तिथे उपस्थित होते, असा दावा देखील त्यांनी केला आहे.

याआधी अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग समोर आला असून, खंडणीप्रकरण, पीक विमा घोटाळा आणि हार्वेस्टर घोटाळ्यासारख्या गैरव्यवहारांमध्ये त्याचे नाव आहे. आता या नव्या आरोपांमुळे त्याच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे.

न्यायालयीन लढाई आणि आरोपांची पुनरावृत्ती-

आज वांद्रे (Bandra) कोर्टात पोटगी संदर्भात सुनावणी झाली, त्यानंतर माध्यमांसमोर करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. न्यायालयाने धनंजय मुंडेंना दोन लाख रुपये पोटगी आणि मुलीसाठी 75 हजार रुपये देण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या सर्व घटनांमुळे आपल्यावर आत्महत्येचा विचार आल्याची खळबळजनक कबुली त्यांनी दिली. मात्र, लोकांच्या समुपदेशानंतर त्यांनी हा विचार सोडून पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

याशिवाय, वाल्मिक कराडने पोलिसांसमोर मारहाण केल्याचे आणि चुकीचा स्पर्श केल्याचे सांगत त्यांनी याप्रकरणी न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच, आपल्याविरोधात बनावट आरोप लावून तीन वर्ष तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, सोशल मीडियावरील व्हिडिओ आणि माध्यमांनी हे सत्य समोर आणल्यामुळे आपण यातून वाचल्याचे त्यांनी सांगितले.

धनंजय मुंडेंच्या आमदारकीवर प्रश्नचिन्ह-

यावेळी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या आमदारकीवर आक्षेप घेतला. निवडणूक अर्जात आपल्या मुलांची नावे देण्यात आली नसल्याचा दावा करत त्यांनी मुंडेंची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली. निवडणुकीत 200 बुथ कॅप्चर करून त्यांनी मतदारसंघात विजय मिळवल्याचा आरोप करत, याबाबत आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला. लवकरच हे पुरावे निवडणूक आयोगासमोर सादर केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले.

News Title : Karuna Sharma Accuses Valmik Karad of Assault

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now