Dhananjay Munde | धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरोधात न्यायालयीन लढाईत पुढे सरसावलेल्या करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी आता थेट त्यांच्या गँगवर गंभीर आणि हादरवून टाकणारे आरोप केले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येचा संदर्भ देत करुणा मुंडे यांनी सांगितले की, ही हत्या क्रूरतेच्या टोकाला नेणारी होती आणि अशा अमानवी प्रवृत्ती धनंजय मुंडे यांच्या गँगमध्ये असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“संतोष देशमुख यांचं प्रकरण इतकं अमानुष होतं की, त्यावर ‘न भूतो ना भविष्यती’ म्हणावं लागेल. ही हत्या क्रूर वृत्तीने करण्यात आली. यामागे धनंजय मुंडे आणि त्यांच्या गुंडा गँगचा हात आहे. ही गँग एवढी ताकदवान आहे की त्यांच्याच मार्फत सर्व कामं पार पडतात. इतक्या वर्षांनीही या गँगच्या क्रौर्यात काहीच फरक पडलेला नाही. सुंब जळालं पण पीळ गेला नाही,” असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं.
धनंजय मुंडेंच्या गँगची औरंगजेबाशी तुलना
करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या गँगची तुलना थेट इतिहासातील अत्यंत क्रूर बादशाह औरंगजेबाशी केली. “औरंगजेबावर चित्रपट आला, पण त्याहीपेक्षा क्रूर वृत्ती या गँगमध्ये आहे,” असे त्यांनी सांगितलं. त्यांनी स्पष्ट केलं की, धनंजय मुंडे यांचे सर्व निर्णय हे त्यांच्या गँगच्या माध्यमातून घेतले जातात, आणि या गँगने अनेकांचा उध्वस्त केले आहे.
25-50 कोटी देऊन शांत करायचं स्वप्न भंगलं
करुणा मुंडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “1998 साली आमचं लग्न झालं. पहिल्यांदा मला म्हाडाच्या रुममध्ये ठेवलं, आणि 2023 मध्ये आम्ही प्रथम घर घेतलं. न्यायालयाने आमच्या नात्याला लग्नासारखं मान्य केलं आहे. धनंजय मुंडेंना वाटत होतं की, मला 25-50 कोटी रुपये देऊन हे प्रकरण मिटवता येईल, पण मी नाचणारी-बोलणारी बाई नाही. माझा आत्मसन्मान आहे, आणि दोन मुलांच्या आई म्हणून मी माझ्या कुटुंबासाठी उभी आहे.”
त्यांनी सांगितलं की न्यायाधीशांनी मुंडे यांच्या वकीलांना विचारलं की, “तुम्ही इतकी वर्षं गप्प का होता?” तसेच, “मला नवऱ्याच्या जीवनशैलीनुसार जगण्याचा हक्क आहे,” हेही कोर्टाने मान्य केल्याचे त्या म्हणाल्या.
Title: Karuna Munde: Dhananjay Munde’s Gang More Brutal Than Aurangzeb






