Ranya Rao | कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रान्या राव (Ranya Rao) हिचं नाव सध्या मोठ्या वादात सापडलं आहे. सोने तस्करी प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या चार्जशीटनंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. तपासात असे समोर आले आहे की या अभिनेत्रीने अवघ्या एका वर्षात तब्बल 127 किलोहून अधिक सोन्याची तस्करी केल्याचा आरोप आहे. ही तस्करी आंतरराष्ट्रीय रॅकेटशी संबंधित असल्याचीही माहिती समोर येत आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार हे प्रकरण साध्या गुन्ह्यापेक्षा खूप मोठं आहे. आफ्रिकेतील काही देशांतून सुरू झालेलं हे रॅकेट दुबईमार्गे भारतात सोन्याची तस्करी करत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात अभिनेत्रीने स्वतः अनेक वेळा दुबईला जाऊन सोने खरेदी करून भारतात आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Kannada Actress Gold Smuggling)
दुबईमार्गे चालायचा सोन्याचा खेळ :
तपासात असे समोर आले आहे की रान्या राव आणि तिचा सहकारी तरुण कोंडूरू यांनी सुरुवातीला युगांडा, केन्या आणि टांझानिया येथून थेट सोने आयात करण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी दुबईमध्ये ‘वीरा डायमंड्स ट्रेडिंग LLC’ नावाची कंपनीही स्थापन करण्यात आली होती. सुरुवातीला 5 किलो सोन्याची डील ठरवण्यात आली होती आणि त्यानंतर 50 किलो सोन्याचा मोठा व्यवहार करण्याची योजना होती.
मात्र मोठी आगाऊ रक्कम दिल्यानंतरही त्यांना सोने मिळाले नाही आणि जवळपास 2 कोटी रुपयांची फसवणूक झाली. त्यानंतर त्यांनी आपली पद्धत बदलत दुबईतील स्थानिक बाजारातून रोख पैशात सोने खरेदी करण्यास सुरुवात केली. अभिनेत्री स्वतः मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेऊन दुबईला जात असे आणि तेथून सोने घेऊन भारतात परत येत असे. (Ranya Rao Gold Smuggling Case)
Ranya Rao | वर्षभरात 15 वेळा प्रवास, 102 कोटींचं सोने :
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार मार्च 2024 ते मार्च 2025 या कालावधीत रान्या रावने दुबई आणि भारत दरम्यान तब्बल 15 वेळा प्रवास केला. या कालावधीत तिने सुमारे 127.87 किलो सोन्याची तस्करी केल्याचा आरोप आहे. या सोन्याची किंमत अंदाजे 102 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणात Central Bureau of Investigation ने एफआयआर दाखल केली असून Enforcement Directorate ने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदवला आहे. आतापर्यंत तपास यंत्रणांनी अभिनेत्रीच्या सुमारे 34 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्ती आणली आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणकोण सहभागी आहेत याचा तपास सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे रान्या रावचे खरे नाव हर्षवर्धिनी रान्या असून तिने 2014 मध्ये ‘माणिक्य’ या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती.






