Iran Israel War | इराण (Iran) आणि इस्रायल (Israel) यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट भारतात उमटू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावामुळे अनेक आयात वस्तूंच्या किमतीत वाढ झाली असून महाराष्ट्रातील बाजारपेठांवर त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसत आहे. विशेषतः कोल्हापूरमधील ड्रायफ्रुट्स व्यापारावर या संघर्षाचा मोठा परिणाम झाला आहे.
ड्रायफ्रुट्स दरात १० ते २५ टक्क्यांची वाढ :
मध्यपूर्वेतील अस्थिरतेमुळे समुद्री वाहतूक विस्कळीत झाली असून विमा खर्च आणि आयात प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. कोल्हापूरमध्ये आखाती देशांतून मोठ्या प्रमाणात खजूर, पिस्ता, बदाम आणि अक्रोड आयात केले जातात. मात्र सध्याच्या परिस्थितीत मालाची आवक कमी झाल्याने दरात १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. रमजान आणि आगामी सणासुदीच्या काळात खजूर व पिस्त्याची मागणी वाढलेली असते, परंतु पुरवठा घटल्याने किरकोळ विक्रेत्यांना महागात माल घ्यावा लागत आहे.
व्यापाऱ्यांकडून साठेबाजीची शक्यता देखील नाकारली गेलेली नाही. परिणामी ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. सणासुदीच्या खरेदीवर त्याचा परिणाम जाणवत असून सामान्य कुटुंबांचे बजेट कोलमडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
Iran Israel War | गेल्या महिन्याच्या तुलनेत दरात मोठी उसळी :
इराणमधून थेट येणाऱ्या काही प्रमुख वस्तूंच्या दरात लक्षणीय बदल दिसून आला आहे. मागील महिन्यात खजूर ३५० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होता, तो आता ४५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. पिस्त्याचा दर पूर्वी १८०० ते २००० रुपये प्रति किलो होता; सध्या तो २५०० ते २६५० रुपयांदरम्यान गेला आहे. मामरा बदामासाठी ग्राहकांना आधी ३००० ते ३२०० रुपये मोजावे लागत होते, तर आता हा दर ४००० ते ४२०० रुपयांपर्यंत वाढला आहे.
शहा जिऱ्याचाही दर ८०० रुपयांवरून थेट १२०० रुपयांवर गेला आहे. तज्ज्ञांच्या मते, मध्यपूर्वेतील तणाव दीर्घकाळ टिकल्यास दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र परिस्थिती लवकर आटोक्यात आल्यास बाजार पुन्हा स्थिर होऊ शकतो. एकूणच, आंतरराष्ट्रीय राजकीय घडामोडींचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठांवर होत असल्याचे या घडामोडीतून स्पष्ट झाले आहे.






