Oil Prices Hike | इराण-इस्त्रायल (Iran- Israel) यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जगभरात ऊर्जा आणि अन्नधान्य क्षेत्रात अस्थिरता निर्माण झाली आहे. विशेषतः भारतात याचा मोठा परिणाम खाद्यतेलाच्या किंमतीवर झाला आहे. सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात वापर होणाऱ्या तेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळे महागाईचा तडाखा आता थेट आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे.
या युद्धामुळे केवळ खनिज तेलाचे दरच नव्हे तर खाद्यतेलाच्या किमतीतही मोठा बदल झाला आहे. युद्ध सुरू होण्याआधी केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क १० टक्क्यांनी कमी केले होते. यामुळे किंमती काही काळासाठी स्थिर राहिल्या होत्या. मात्र, सध्याच्या परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किमतीत बॅरलमागे ६ डॉलर वाढ झाली असून त्याचा परिणाम सरकी, पाम व सूर्यफूल तेलावर दिसतो आहे. (Oil Prices Hike News)
घाऊक बाजारात दरवाढ; ग्राहकांची चिंता वाढली :
मार्केट यार्डमधील घाऊक बाजारात खाद्यतेलाच्या दरात प्रतिकिलो ३ ते ४ रुपये आणि डबाबंद पंधरा लिटरच्या तेलात ५० ते ६० रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ केवळ सुरुवात असून, येत्या काळात दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मागणी वाढलेली असतानाच पुरवठा अडथळलेला असल्याने हे चित्र दिसत आहे.
सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने यापूर्वीच इशारा दिला होता की भूराजकीय तणाव, विशेषतः इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम खाद्यतेलाच्या किंमतीवर होईल. आता ही शंका खरी ठरत आहे. काही जहाजे जे तेलाच्या आयातीसाठी रवाना झाली होती, ती युद्धजन्य परिस्थितीमुळे बंदरांवरच अडकून पडली आहेत. त्यामुळे भारतात होणारा आयात पुरवठा लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.
Oil Prices Hike | स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद होण्याचा धोका :
इराणच्या संसदेमधून स्ट्रेट ऑफ होर्मूज जलमार्ग बंद करण्याचा ठराव मंजूर झाला आहे. हा जलमार्ग तेल वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जातो. यामुळे तेलसाठवणूक करणाऱ्या जहाजांची हालचाल थांबण्याची शक्यता आहे. केवळ तेलच नव्हे तर इतर वस्तूंच्या पुरवठ्यावरही या घटनेचा परिणाम होऊ शकतो. जर मागणी आणि पुरवठा यांचे संतुलन ढासळले, तर महागाई आणखी तीव्र होण्याची भीती आहे. (Oil Prices Hike News)
युद्धाचे हे पडसाद केवळ भारतापुरते मर्यादित नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा अनेक देश या युद्धामुळे चिंतेत आहेत. रशिया, चीन, तुर्कीसारखे देश मध्यस्थी करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत माहिती देण्याच्या अटीवर हा संघर्ष थांबवण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र, तोपर्यंत भारतासारख्या देशांतील सर्वसामान्य नागरिकांना या महागाईचा तडाखा सहन करावा लागणार आहे. (Iran- Israel)






