1 एप्रिलपासून आयकर नियमात सर्वात मोठे बदल लागू; जाणून घ्या नेमका काय परिणाम होणार?

On: March 21, 2026 3:17 PM
Income Tax Rules 2026
---Advertisement---

Income Tax Rules 2026 | देशातील कर प्रणाली अधिक पारदर्शक आणि सोपी करण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने नव्या आयकर नियम 2026 ला अधिसूचना दिली असून हे नियम 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. नव्या नियमांमुळे कर व्यवस्थेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून त्याचा परिणाम कंपन्या, कर्मचारी आणि डिजिटल अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे.

नवीन नियमांद्वारे कर प्रणाली अधिक डेटा-आधारित आणि पद्धतशीर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे करदात्यांना आयकर भरताना असलेली गुंतागुंत कमी होईल आणि कर भरण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल, असा सरकारचा दावा आहे. हा नवीन कायदा लागू झाल्यानंतर जुना Income Tax Act 1961 हळूहळू बाजूला होणार आहे.

डिजिटल कंपन्या कराच्या कक्षेत :

नव्या नियमांचा सर्वात मोठा परिणाम डिजिटल आणि ऑनलाईन कंपन्यांवर होणार आहे. अनेक कंपन्या परदेशात कार्यालय ठेवून भारतात डिजिटल सेवा देत होत्या. अशा कंपन्यांवर आतापर्यंत थेट कर लागू होत नव्हता.

मात्र आता भारतात सेवा देऊन किंवा भारतीय ग्राहकांकडून उत्पन्न मिळवणाऱ्या कंपन्यांना कर भरावा लागणार आहे. मोबाईल अ‍ॅप्स, डिजिटल सेवा, ऑनलाइन प्लॅटफॉर्म किंवा सॉफ्टवेअर सेवा देणाऱ्या कंपन्यांनाही कराच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा निर्णय आहे. त्यामुळे डिजिटल क्षेत्रातील व्यवहारांवर अधिक नियंत्रण ठेवता येणार आहे.

Income Tax Rules 2026 | शेअर बाजार आणि पगारावरही परिणाम :

नव्या नियमांनुसार शेअर बाजारातील व्यवहारांवरही अधिक बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. शेअर खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार किमान सात वर्षे जतन करून ठेवणे बंधनकारक असेल. तसेच या व्यवहारांमध्ये झालेल्या बदलांची माहिती नियमितपणे सरकारला द्यावी लागणार आहे. या निर्णयामुळे शेअर बाजारातील व्यवहार अधिक पारदर्शक होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, नव्या नियमांचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या टेक होम सॅलरीवरही होऊ शकतो. घरभाडे भत्ता (HRA) आता शहराच्या लोकसंख्येच्या आधारावर ठरवला जाऊ शकतो. तसेच ऑफिसमध्ये मिळणाऱ्या मोफत जेवणावरही मर्यादा घालण्यात आली आहे. प्रति जेवण केवळ 200 रुपयेपर्यंतच करसवलत मिळणार आहे. याशिवाय 15 हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या भेटवस्तूंवर कर लागू होणार आहे.

एकूणच, नव्या आयकर नियमांमुळे देशातील आर्थिक व्यवहारांचा अधिक स्पष्ट आणि डिजिटल पद्धतीने मागोवा घेता येणार आहे. त्यामुळे कर प्रणाली अधिक सुलभ आणि पारदर्शक होईल, अशी अपेक्षा सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे.

News Title: Income Tax Rules 2026: Major Changes From April 1; Impact On Salary, Digital Companies And Stock Market

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now