HSRP Last Date | हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम तारीख आता अवघ्या 24 तासांवर आली असून लाखो वाहनधारकांवर दंडाची टांगती तलवार आहे. 30 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख जाहीर केली असून यानंतर अर्ज न करणाऱ्यांना 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
राज्यातील लाखो वाहनांनी अजूनही HSRP साठी नोंदणी केलेली नसल्याने वाहन विभाग पूर्णपणे सज्ज झाला आहे. ही अंतिम मुदत चुकल्यास नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसेल, त्यामुळे वाहनधारकांनी तातडीने रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. (High security number plate)
HSRP साठी 30 नोव्हेंबर शेवटची तारीख :
अहवालानुसार, एप्रिल 2019 पूर्वी रजिस्टर झालेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ देऊनही मोठ्या प्रमाणात वाहनधारकांनी प्रतिसाद दिला नाही. बुकिंग केलेल्या सुमारे 56 हजार वाहनांना प्लेट बसवण्याचे काम सध्या सुरू आहे. (HSRP Last Date)
परंतु सर्वात मोठी चिंता आहे ती अजूनही अर्ज न केलेल्या लाखो वाहनांची. यापैकी अनेकांनी रजिस्ट्रेशन तर केले आहे पण नंबर प्लेट अद्याप बसवलेली नाही. रजिस्ट्रेशन करूनही प्लेट न बसवणाऱ्यांसाठी 1,000 रुपयांचा दंड निश्चित केला आहे. मात्र अजिबातच अर्ज न केलेल्यांना सरळ 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. त्यामुळे डेडलाईनपूर्वी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
4 थी मुदतवाढ मिळण्याची शक्यता; मात्र अधिकृत आदेश नाही :
सरकारने यापूर्वी 30 एप्रिल 2025, 15 ऑगस्ट 2025 आणि 30 नोव्हेंबर 2025 अशा तीन वेळा मुदतवाढ दिली आहे. वाहनधारकांचा कमी प्रतिसाद पाहता चौथी मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राथमिक चर्चेनुसार, नवीन अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 पर्यंत (HSRP Last Date) वाढवली जाऊ शकते.
मात्र अजूनपर्यंत सरकारकडून कोणतेही अधिकृत नोटिफिकेशन जारी झालेले नाही. त्यामुळे 30 नोव्हेंबर ही सध्याची लागू असलेली शेवटची तारीख मानूनच कामकाज सुरू ठेवावे लागणार आहे. वाहनधारकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारी, तसेच पेंडिंग अर्जांची मोठी संख्या पाहता सरकार डेडलाईन वाढवण्याचा विचार करू शकते, अशी बातमी सरकारी स्रोतांकडून समोर येत आहे.
HSRP अनिवार्य का? चोरी आणि गैरवापर रोखण्यासाठी मोठा निर्णय :
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेली ॲल्युमिनियम प्लेट ज्यात अनेक सुरक्षा फीचर्स असतात. यात अशोक चक्राचे होलोग्राम, लेसर एन्कोडेड 9 अंकी युनिक आयडी आणि न काढता येणारा स्नॅप लॉक बसवलेला असतो. त्यामुळे वाहन चोरी, नंबर प्लेट बदलणे, गैरवापर, गुन्हे करण्यासाठी वाहनांचा वापर अशा गंभीर गुन्ह्यांवर मोठा आळा बसतो. (High security number plate)
भारतातील रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी आणि वाहनांचा डिजिटल ट्रॅक ठेवण्यासाठी HSRP नंबर प्लेट्सचा वापर आवश्यक असल्याचे सरकारचे मत आहे. अनेक राज्यांमध्ये हा नियम आधीच लागू करण्यात आला असून महाराष्ट्रात आता कडकपणे अंमलबजावणी सुरू झाली आहे.
मोठा दंड टाळायचा असेल तर तातडीने रजिस्ट्रेशन करा :
ज्यांनी अद्याप HSRP नंबर प्लेटसाठी अर्ज केलेला नाही त्यांनी तातडीने अधिकृत पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी. एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर वाहनधारकांना दिलेल्या तारखेला नजीकच्या फिटमेंट सेंटरमध्ये जाऊन प्लेट बसवण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. फक्त एका दिवसाचा विलंबही 10 हजार रुपयांचा दंड लागू शकतो.
वाहतूक विभागानुसार सर्व वाहनांवर तात्काळ कारवाई करणे शक्य नसले तरी नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू राहणार आहे. नागरिकांच्या वाढत्या रोषामुळे आणि प्रलंबित अर्जांच्या संख्येमुळे सरकार मुदतवाढ देऊ शकते, पण हे निश्चित नसल्याने वाहनधारकांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आजच नोंदणी करण्याचा सल्ला दिला जात आहे.






