HSC Exam | राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उद्यापासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत असून, यासंदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तातडीची पत्रकार परिषद घेतली. बोर्डाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी परीक्षेच्या नियोजनाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. यंदा परीक्षेच्या प्रक्रियेत काही बदल करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (HSC Exam News)
बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत पार पडणार असून, दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्चदरम्यान होणार आहे. यंदा राज्यभरातून तब्बल 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. 3387 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार असून, यामध्ये विज्ञान शाखेचे 7 लाख 99 हजार 773, कला शाखेचे 3 लाख 80 हजार 692 आणि वाणिज्य शाखेचे 3 लाख 20 हजार 152 विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची व्यवस्था :
नंदकुमार बेडसे यांनी सांगितले की, कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी 3 फेब्रुवारीपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावावर मात करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन समुपदेशक नेमण्यात आले असून, बोर्ड स्तरावरही 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे समुपदेशक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत. (HSC Exam News)
परीक्षा काही विषयांसाठी सकाळी 11 वाजता तर काही विषयांसाठी दुपारी 3 वाजता घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर किमान अर्धा तास आधी उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे. तसेच हॉलतिकिट शाळांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
HSC Exam | पेपर वाचनाच्या वेळेबाबत मोठा बदल :
यंदा परीक्षेतील महत्त्वाचा बदल म्हणजे प्रश्नपत्रिका वाचण्याच्या वेळेबाबत घेतलेला निर्णय. याआधी परीक्षा सुरू होण्यापूर्वी 10 मिनिटे प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दिली जात होती. मात्र आता परीक्षा सुरू झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना 10 मिनिटांचा वेळ देण्यात येणार असून, हा वेळ परीक्षेच्या शेवटी जोडला जाणार आहे. पेपर लीकसारख्या घटना टाळण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.
तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना दर तासाला 20 मिनिटे अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून शपथही घेतली जाणार आहे. बोर्डाने विद्यार्थ्यांना शांत राहून आत्मविश्वासाने परीक्षा देण्याचे आवाहन केले आहे.






