Yogesh Kadam | राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या डान्स बार प्रकरणावरून मोठी खळबळ उडाली आहे. आरोपांची राळ उठलेल्या राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी साथ देत त्यांची पाठराखण केल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांना “योगेश, चिंता करू नको, मी तुझ्या पाठिशी आहे,” असे वक्तव्य करत आपला पाठिंबा दर्शवला आहे, ज्यामुळे या प्रकरणात राजकीय वजन वापरले जात असल्याच्या चर्चांना बळ मिळाले आहे.
अनिल परब यांनी विधान परिषदेत गंभीर केला आरोप :
मुंबईतील डान्सबारवरून योगेश कदम यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने आरोप होत आहेत. याच प्रकरणावरून रामदास कदम (Ramdas kadam) यांनी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर टीका केली आहे. “डान्सबार चालवणाऱ्यांची आमची औलाद नाही, तर आम्ही तरुणांना रोजगार देणारे आहोत,” असे रामदास कदम यांनी म्हटले आहे, ज्यामुळे या प्रकरणात शाब्दिक युद्ध अधिक तीव्र झाले आहे.
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil parab) यांनी विधान परिषदेत गंभीर आरोप केला आहे की, मुंबईतील कांदिवली येथील ‘सावली’ नावाच्या डान्स बारचा परवाना योगेश कदम यांच्या मातोश्री (आई) ज्योती कदम यांच्या नावाने आहे. योगेश कदम स्वतः गृहराज्यमंत्री असताना, त्यांच्या कुटुंबाच्या मालकीचा किंवा त्यांच्या नावाने परवाना असलेला डान्स बार सुरू असणे हे पदाचा गैरवापर असल्याचे म्हणत विरोधकांकडून योगेश कदमांवर जोरदार टीकास्त्र डागण्यात येत आहे.
Yogesh Kadam | योगेश कदम यांची राजकीय कोंडी :
या आरोपांमुळे योगेश कदम यांची राजकीय कोंडी झाली आहे. एका बाजूला गृहराज्यमंत्री म्हणून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी, तर दुसऱ्या बाजूला कुटुंबातील सदस्याच्या नावाने डान्स बारचा परवाना असणे, ही दुहेरी भूमिका त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी पाठराखण केली असली तरी, विरोधक या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत आहेत.
या प्रकरणात सत्य काय आहे आणि योगेश कदम यांच्यावर केलेले आरोप किती खरे आहेत, याचा तपास होणे गरजेचे आहे. डान्स बार प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे होऊन दोषींवर कारवाई झाल्यासच, जनतेचा कायद्यावरील विश्वास कायम राहील.






