Rain Alert | देशभरात हवामानात मोठे बदल होताना दिसत असून काही भागात थंडी, काही ठिकाणी उकाडा तर अनेक राज्यांत पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 5, 6 आणि 7 फेब्रुवारीसाठी अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. या बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावरही थेट परिणाम होत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.
महाराष्ट्रातही मागील काही दिवसांपासून हवामानात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. थंडी जवळपास गायब झाली असून उकाडा वाढत असल्याचे चित्र आहे. ढगाळ वातावरणामुळे काही भागांत दमट हवामान जाणवत असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. (Maharashtra Weather Update)
केरळ, तामिळनाडूसह दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा :
हवामान खात्यानुसार केरळ किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची शक्यता वाढली आहे. याचा परिणाम म्हणून तामिळनाडूमध्ये 5, 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Rain Alert)
पुद्दुचेरी, रायलसीमा आणि माहे या भागांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज असून स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेती, वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर या पावसाचा परिणाम होऊ शकतो, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
Rain Alert | उत्तर भारतात थंडी तर मध्य भारतातही पावसाचा अलर्ट :
उत्तर भारतात थंडीचा जोर कायम असून हरियाणातील हिस्सार येथे देशातील सर्वात कमी तापमान 4.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान पावसासह बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्य भारतातील छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्येही हवामान बदलाचे संकेत असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशातील काही भागांत थंडी, काही ठिकाणी उकाडा तर अनेक ठिकाणी पाऊस अशी तिन्ही ऋतूंची अनुभूती एकाच वेळी येत आहे.






