महाराष्ट्रात तीन दिवस मुसळधार पाऊस; कुठे रेड तर कुठे यलो अलर्ट जारी

On: July 22, 2026 7:38 PM
Maharashtra Weather
---Advertisement---

Maharashtra Weather | राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने 23 ते 25 जुलैदरम्यान अनेक जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. पूर्व मध्यप्रदेशातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि अरबी समुद्रावरील दमदार आर्द्रतेमुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

23 जुलैसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट :

23 जुलै रोजी पुणे (Pune) जिल्ह्यातील घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून येथे अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पालघर (Palghar), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), नाशिक (Nashik) घाट परिसर आणि सातारा (Satara) घाट भागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, कोल्हापूर (Kolhapur) घाट परिसर तसेच विदर्भातील अकोला (Akola), अमरावती (Amravati), भंडारा (Bhandara), बुलढाणा (Buldhana), चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया (Gondia), नागपूर, वर्धा (Wardha), वाशीम (Washim) आणि यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. विशेषतः विदर्भात काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.

Maharashtra Weather | 24 ते 25 जुलैचा अंदाज आणि नागरिकांसाठी सूचना :

24 जुलै रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता कायम राहणार आहे. त्यानंतर 25 जुलैलाही कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पाऊस सुरू राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आषाढी एकादशीपर्यंत राज्यात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता असल्याने पुढील काही दिवस पावसाचा प्रभाव कायम राहू शकतो.

हवामान विभागाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. मुसळधार पावसाच्या काळात बाहेर पडण्यापूर्वी वाहतुकीची माहिती घेण्याचे, पाणी साचणाऱ्या भागांपासून दूर राहण्याचे आणि कमकुवत इमारतींमध्ये आश्रय न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजांचा कडकडाट होत असताना मोकळ्या जागेत किंवा शेतात काम टाळावे तसेच विद्युत उपकरणे वीजपुरवठ्यापासून वेगळी ठेवावीत, असेही सांगण्यात आले आहे.

News Title: Heavy Rain Alert Across Maharashtra

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now