Maharashtra weather update | राज्यात सध्या हवामानाचा वेगाने बदलणारा स्वभाव नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. काही भागांत तीव्र उष्णतेचा त्रास वाढत असताना तर दुसरीकडे पावसाचे वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा तर काही भागांत वादळी पावसाचा इशारा दिला असून ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
कोकण आणि विदर्भात तापमानाची झेप :
महाराष्ट्रातील हवामानात अस्थिरता निर्माण झाली असून उत्तर कोकण आणि विदर्भात मागील दोन दिवसांपासून तीव्र उष्णता जाणवत आहे. गुजरात (Gujarat) आणि महाराष्ट्राच्या काही भागांवर निर्माण झालेल्या प्रतिचक्रवात (Anticyclone) परिस्थितीमुळे तापमानात अचानक वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये उकाडा वाढून नागरिक त्रस्त झाले आहेत आणि हवामान विभागाने सावधगिरीचा इशारा दिला आहे.
मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आणि पालघर (Palghar) या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट अनुभवायला मिळाली. मुंबईतील सांताक्रूझ भागात तापमान तब्बल 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने अनेक वर्षांतील विक्रम मोडल्याचे सांगितले जात आहे. डहाणू (Dahanu) आणि सांताक्रूझ या किनारपट्टी भागातही तापमानाने 40 अंशांचा टप्पा गाठला आहे. समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या दिशेत झालेल्या बदलामुळे निर्माण झालेला उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे.
Maharashtra weather update | वादळी पावसाचा इशारा आणि यलो अलर्ट :
उष्णतेबरोबरच राज्यातील काही भागांत पावसासाठी पोषक परिस्थितीही तयार झाली आहे. बिहार (Bihar) पासून छत्तीसगड (Chhattisgarh) पर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे वातावरण ढगाळ बनले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार शुक्रवारी विदर्भ आणि मराठवाडा भागात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर शनिवारी आणि रविवारी कोकण वगळता राज्यातील बहुतांश भागांत वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नागपूर (Nagpur), वर्धा (Wardha), चंद्रपूर (Chandrapur), गडचिरोली (Gadchiroli) आणि यवतमाळ (Yavatmal) या जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्याने या भागांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. दरम्यान विदर्भातील अकोला (Akola) येथे सर्वाधिक 40.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले असून ब्रह्मपुरी (Brahmapuri) येथे 40.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अमरावती (Amravati), वाशीम (Washim) आणि धुळे (Dhule) या भागांतही तापमान 39 अंशांच्या आसपास पोहोचल्यामुळे दुपारच्या वेळेत उष्णतेचा त्रास वाढला आहे.






