HDFC Bank Rule | देशातील आघाडीची खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँक (HDFC Bank) ने आपल्या ग्राहकांसाठी काही महत्त्वाचे आर्थिक बदल जाहीर केले आहेत. कर्जाच्या व्याजदरात कपात, मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ तसेच एटीएम व्यवहार आणि लॉकर शुल्कातही सुधारणा करण्यात आली आहे. काही बदल 7 मार्च 2026 पासून लागू झाले असून काही नियम 1 एप्रिल 2026 पासून अमलात येणार आहेत.
कर्ज स्वस्त, एफडीवर अधिक परतावा :
एचडीएफसी बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 10 बेसिस पॉईंट्सपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन दर 7 मार्च 2026 पासून लागू करण्यात आले आहेत. सुधारित दरानुसार ओव्हरनाईट आणि एका महिन्याच्या कालावधीसाठी व्याजदर 8.15 टक्के करण्यात आला आहे, जो यापूर्वी 8.25 टक्के होता. याशिवाय तीन महिन्यांच्या कर्जासाठी दर 8.25 टक्के ठेवण्यात आला आहे, तर सहा महिने आणि एका वर्षाच्या कालावधीसाठी हा दर 8.35 टक्के आहे.
या निर्णयामुळे ज्यांचे कर्ज MCLR शी जोडलेले आहे अशा ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. कारण त्यांच्या मासिक हप्त्यात म्हणजेच EMI मध्ये किंचित घट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे गुंतवणूकदारांसाठीही बँकेने चांगली बातमी दिली आहे. तीन वर्षे एक दिवस ते चार वर्षे सात महिने या कालावधीच्या मुदत ठेवींवर आता सामान्य ग्राहकांना 6.50 टक्के व्याज मिळणार आहे, जे यापूर्वी 6.40 टक्के होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 7 टक्के करण्यात आला आहे, जो पूर्वी 6.90 टक्के होता.
HDFC Bank Rule | एटीएम व्यवहार आणि लॉकर शुल्कात बदल :
बँकेने एटीएम व्यवहारांसंदर्भातही महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. 1 एप्रिल 2026 पासून एटीएममधून यूपीआय (UPI) च्या माध्यमातून रोख रक्कम काढण्याच्या व्यवहाराला मोफत मासिक व्यवहारांच्या मर्यादेत गणले जाणार आहे. म्हणजेच ‘कॅशलेस विथड्रॉल’ ही सुविधा वापरताना ती तुमच्या फ्री लिमिटमध्ये समाविष्ट होईल.
जर ग्राहकांनी मोफत व्यवहारांची मर्यादा ओलांडली तर त्यानंतर प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी 23 रुपये आणि त्यावर लागू होणारा कर भरावा लागेल. याशिवाय बँकेने लॉकर सुविधेमध्येही काही सुधारणा केल्या आहेत. ‘मेट्रो प्लस’ (Metro Plus) नावाची नवीन श्रेणी सुरू करण्यात आली असून लॉकरचे भाडे आता त्याच्या आकारमानावर आणि शाखेच्या स्थानानुसार ठरणार आहे. या शुल्कावर स्वतंत्रपणे जीएसटी (GST) आकारला जाणार असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.






