Hansika Motwani Divorce | साऊथ आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे हंसिका मोटवानी. तिच्या वैयक्तिक आयुष्यात मोठं वादळ आलं आहे. चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या घटस्फोटांच्या मालिकेत आता अभिनेत्री हंसिका मोटवानी (Hansika Motwani) हिच्या नावाचाही समावेश झाला आहे. हंसिका मोटवानीचा घटस्फोट झाला असून अभिनेत्रीचा 4 वर्षांचा संसार मोडला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हंसिका आणि तिचा पती सोहेल कथूरिया (Sohail Kathuria) यांच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगत होत्या. अखेर या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून या दोघांनी अधिकृतपणे वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
हंसिका मोटवानीचा घटस्फोट
मुंबईतील (Mumbai) वांद्रे न्यायालयाने (Bandra Court) हंसिका आणि सोहेल यांचा घटस्फोट कायदेशीररीत्या मंजूर केला आहे. या निकालामुळे त्यांच्या लग्नातील दुराव्याच्या बातम्यांवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. या जोडीचा संसार केवळ चार वर्षातच संपुष्टात आला.
हंसिका आणि सोहेल यांचे लग्न 4 डिसेंबर 2022 रोजी जयपूरमध्ये अत्यंत शाही पद्धतीने पार पडले होते. मात्र, विवाहाच्या चौथ्या वर्षातच त्यांनी परस्परांच्या संमतीने कायदेशीररित्या वेगळे होण्याचा मार्ग निवडला. या जोडप्याला या विवाहातून कोणतेही अपत्य नाही. सिनेसृष्टीतील कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातील या मोठ्या घडामोडीमुळे सध्या सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
हंसिका आणि सोहेलचे नाते सुरुवातीपासूनच प्रचंड वादाच्या भोवऱ्यात होते. सोहेलचे हे दुसरे लग्न होते. त्याची पहिली पत्नी रिंकी बजाज ही हंसिकाची खूप जवळची मैत्रीण होती, आणि विशेष म्हणजे हंसिका स्वतः सोहेल व रिंकीच्या पहिल्या लग्नाला हसतमुख चेहऱ्याने उपस्थित होती. त्यामुळे जेव्हा हंसिकाने सोहेलशी लग्न करण्याची घोषणा केली, तेव्हा सोशल मीडियावर तिच्यावर ‘मैत्रिणीचा नवरा पळवल्याचा’ आणि स्वतःच्याच मैत्रिणीचा संसार मोडल्याचा गंभीर आरोप नेटकऱ्यांनी केला होता.
दरम्यान, ‘शाका लाका बूम बूम’ आणि ‘कोई मिल गया’ यांसारख्या गाजलेल्या मालिका व चित्रपटांमधून बालकलाकार म्हणून घराघरात पोहोचलेली आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत स्वतःची भक्कम ओळख निर्माण केलेली प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी (Hansika Motwani) हिच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे.








