Gold Price Prediction | जागतिक पातळीवर वाढलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अर्थव्यवस्थांमध्ये मोठी उलथापालथ होत आहे. विशेषतः इराण (Iran) आणि इस्रायल (Israel), अमेरिका (United States) संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधताना दिसत आहेत. या वातावरणात सोन्याच्या दरांबाबत तज्ज्ञांनी व्यक्त केलेला अंदाज अत्यंत लक्षवेधी ठरत असून पुढील काही वर्षांत दर मोठ्या झेपेची शक्यता वर्तवली जात आहे.
सोन्याच्या दरांबाबत धाडसी अंदाज :
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किंमतींपासून ते स्थावर मालमत्तेपर्यंत अनेक क्षेत्रांवर त्याचे पडसाद उमटले असले तरी सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जात आहे. आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज कंपनी जेफरीज (Jefferies) ने सोन्याच्या भविष्यातील किंमतींबाबत मोठा दावा केला आहे. त्यांच्या विश्लेषणानुसार, पुढील पाच वर्षांत सोन्याचे दर सध्याच्या पातळीपेक्षा दुपटीने वाढू शकतात. (Gold Price Prediction)
जेफरीजचे इक्विटी स्ट्रॅटेजी प्रमुख ख्रिस वूड (Chris Wood) यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आगामी काळात सोन्याची किंमत १० हजार डॉलर्सपर्यंत जाऊ शकते, ज्याचा भारतीय बाजारात अंदाजे तीन लाख रुपये प्रतितोळा असा दर होऊ शकतो. विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी सुरू असून सध्याच्या भूराजकीय संकटामुळेही दरांना आधार मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
Gold Price Prediction | युद्ध आणि सुरक्षित गुंतवणुकीचा कल :
इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त कारवाईनंतर गुंतवणूकदारांनी सोन्याकडे ‘सेफ हेवन’ मालमत्ता म्हणून अधिक प्रमाणात वळण घेतले आहे. शेअर बाजारात वाढलेली अनिश्चितता आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील जोखमीमुळे स्थिर पर्याय म्हणून सोन्याची निवड केली जात आहे. युद्धकाळात विविध देशांच्या चलनांमध्ये चढ-उतार होत असतात, अशा वेळी सोन्याचे मूल्य तुलनेने स्थिर राहते किंवा वाढते, हा अनुभव पुन्हा समोर आला आहे.
मध्यपूर्वेतील संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने मौल्यवान धातूंच्या बाजारातही हालचाल वाढली आहे. काही तज्ज्ञांच्या मते, युद्धाची तीव्रता कमी झाल्यानंतर बाजार पुन्हा स्थिर होऊ शकतो. मात्र सोन्याबाबत गुंतवणूकदारांची मानसिकता बदलली असून मागणी वाढलेली असल्याने तेजीचा कालावधी दीर्घकाळ टिकू शकतो. तरीही आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सोन्याचे दर अवलंबून असल्यामुळे भविष्यात चढ-उतार होण्याची शक्यता कायम राहणार आहे.






