Today Gold Price | गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. बुधवारी कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीने जोरदार पुनरागमन करत दरांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली. एमसीएक्सवर सोन्याने पुन्हा दीड लाखांचा टप्पा ओलांडला असून, 10 ग्रॅम सोन्यासाठी आता तब्बल 1,58,436 रुपये मोजावे लागत आहेत.
एमसीएक्स आणि देशांतर्गत बाजारातील दरवाढ :
कमॉडिटी मार्केटमध्ये बुधवारी सोने-चांदीच्या किमतीत जवळपास 1 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि स्पॉट मार्केटमधील वाढती खरेदी यामुळे एमसीएक्सवर एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 1,600 रुपयांहून अधिक वाढून प्रति 10 ग्रॅम 1,58,436 रुपयांवर पोहोचला. याचवेळी चांदीच्या दरातही जोरदार हालचाल दिसून आली असून मार्च डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 2.6 टक्क्यांनी वाढत 2,59,053 रुपये प्रति किलो झाला, तर नंतर व्यवहारादरम्यान तो आणखी वाढून 2,60,557 रुपयांच्या उच्चांकावर गेला. (Today Gold Price)
11 फेब्रुवारी रोजी सुरुवातीच्या सत्रात चांदीच्या दरात तब्बल 8,009 रुपयांची वाढ झाली. रिटेल बाजारातही याचा परिणाम दिसून आला असून 24 कॅरेट सोन्याचा दर 1,300 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 1,58,100 रुपये झाला. त्याचवेळी चांदीचा भाव 7,930 रुपयांनी उडी घेत 2,61,220 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
Today Gold Price | आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आणि दरवाढीची कारणे :
जागतिक पातळीवरही मौल्यवान धातूंमध्ये तेजी कायम राहिली आहे. स्पॉट सिल्व्हर 2.2 टक्क्यांनी वाढून 82.43 डॉलर प्रति औंसवर पोहोचले, तर स्पॉट गोल्ड 0.5 टक्क्यांनी वधारत 5,049.59 डॉलर प्रति औंसवर स्थिरावले. अमेरिकन गोल्ड फ्युचर्समध्येही जवळपास 1 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे, ज्याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसून आला.
या दरवाढीमागे अनेक आंतरराष्ट्रीय घटक कारणीभूत ठरले आहेत. अमेरिकन ट्रेझरी बाँडवरील उत्पन्नात घट झाल्यामुळे बुलियन मार्केटमध्ये गुंतवणूक वाढली आहे. डिसेंबर महिन्यातील किरकोळ विक्रीचे आकडे अमेरिकन अर्थव्यवस्था मंदावत असल्याचे संकेत देत असल्याने गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोने-चांदीकडे वळले आहेत. तसेच फेडरल रिझर्व्ह (Federal Reserve) कडून व्याजदर कपातीची शक्यता वर्तवली जात असल्याने नॉन-यिल्ड मालमत्ता अधिक आकर्षक ठरत आहेत. (Today Gold Price)
याशिवाय डॉलर निर्देशांक 0.15 टक्क्यांनी घसरून 96.66 वर आल्याने इतर चलनांमध्ये व्यवहार करणाऱ्यांसाठी सोने आणि चांदी स्वस्त झाल्यामुळे मागणी वाढली आहे.






