Gold & Silver Price | मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता थेट जागतिक अर्थकारणावर उमटू लागले आहेत. इराण (Iran) आणि इस्रायल (Israel) यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चितता निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर दिसून येत आहे. भारतातही आज, 2 मार्च 2026 रोजी सकाळपासून मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे.
युद्धाचा परिणाम, सोन्याच्या दरात विक्रमी उसळी :
इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध केवळ त्या दोन देशांपुरते मर्यादित राहिलेले नसून त्याचा प्रभाव संपूर्ण जगावर होत आहे. या संघर्षामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्या-चांदीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. फेब्रुवारी महिना नुकताच संपला असून या संपूर्ण महिन्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली होती. जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये सोन्याचा भाव तब्बल 5.056 टक्क्यांनी वाढला होता. (Gold & Silver Price News)
आता युद्धाची तीव्रता वाढल्याने मार्चच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा झेप घेतली आहे. अमेरिका (United States) आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये सुमारे 2 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. आज, सोमवार 2 मार्च 2026 रोजी, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस 5,384.52 डॉलर्स या नव्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. युद्धाची परिस्थिती कायम राहिल्यास येत्या काळात सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
Gold & Silver Price | भारतात सोनं-चांदी किती महागली? :
आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा परिणाम थेट भारतीय सराफा बाजारातही जाणवत आहे. गेल्या आठवड्यात मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीच्या किमती 22,054 रुपये म्हणजेच 8.72 टक्क्यांनी वाढल्या, तर सोन्याच्या किमतींमध्ये 5,228 रुपयांची म्हणजे 3.33 टक्क्यांची वाढ झाली होती. दिल्ली (Delhi) आणि मुंबई (Mumbai) यांसारख्या प्रमुख शहरांमध्येही आज सकाळपासून सोन्या-चांदीचे दर वाढताना दिसत आहेत.
भारतीय स्पॉट मार्केटमध्ये सोन्याने आज नवा उच्चांक गाठला आहे. मागील व्यापार सत्रात प्रति 10 ग्रॅम 1,62,490 रुपये असलेला सोन्याचा दर आज थेट 1,73,090 रुपयांवर पोहोचला. म्हणजेच अवघ्या एका व्यापार सत्रात सोन्याच्या किमतीत 10 हजार रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. ही वाढ सर्वसामान्य ग्राहकांसाठी मोठा धक्का मानली जात आहे.
सोन्यापाठोपाठ चांदीनेही आज जोरदार झेप घेतली आहे. शुक्रवारी, 27 फेब्रुवारी रोजी चांदीचा दर 2,82,140 रुपये प्रति किलो इतका होता. मात्र आज सकाळी तो वाढून 2,94,900 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. बुलियन बाजारातील आकडेवारीनुसार, युद्धामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे मौल्यवान धातूंची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सध्या सोनं आणि चांदी दोन्ही ऐतिहासिक तेजीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आज होळीच्या मुहूर्तावर दागिने खरेदी किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर दुकानात जाण्यापूर्वी आजचे दर नक्की तपासण्याचा सल्ला दिला जात आहे.






