Gas Leak Tarapur | पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीत आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. येथील मेडली फार्मासिटीकल कंपनीत नायट्रोजन रिएक्शन टँकमध्ये गॅस गळती होऊन सहा कामगार बेशुद्ध झाले. त्यापैकी चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
काल दुपारी अडीच ते तीन वाजेदरम्यान ही घटना घडली. गॅस गळती नेमकी कशी झाली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिस व प्रशासनाकडून या घटनेची चौकशी सुरू असून दुर्घटनेमागील कारण शोधण्याचे काम सुरू आहे. अपघाताची बातमी पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली. (Gas Leak Tarapur)
मृतांचा आकडा वाढला, जखमींवर ICU मध्ये उपचार :
मेडली फार्मासिटीकल कंपनी प्लॉट नंबर एफ 13 मध्ये ही घटना घडली. गॅस गळतीनंतर सहा कामगार अचानक बेशुद्ध पडले. तात्काळ त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यातील चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये कल्पेश राऊत, बंगाली ठाकूर, धीरज प्रजापती आणि कमलेश यादव यांचा समावेश आहे. तर दोन जखमींमध्ये रोहन शिंदे आणि निलेश हाडळ यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.
या अपघातामुळे कंपनीतील सुरक्षाव्यवस्थेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. गॅस गळती टाळण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा असूनही असा प्रकार कसा घडला, याचा तपास सुरु आहे. कामगारांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Gas Leak Tarapur | कारण अद्याप अस्पष्ट, परिसरात भीतीचं वातावरण :
नायट्रोजन गॅस गळतीमुळे ही दुर्घटना घडल्याचं प्राथमिक तपासात दिसून येत आहे. मात्र गळतीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. हा अपघात मानवी निष्काळजीपणामुळे झाला की तांत्रिक बिघाडामुळे, हे पुढील चौकशीत स्पष्ट होणार आहे. दरम्यान, अपघातस्थळी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाची टीम दाखल झाली असून परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Gas Leak Tarapur)
या घटनेमुळे तारापूर औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या इतर उद्योगांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं आहे. स्थानिक नागरिकांनी कामगारांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.






