Gas Cylinder Storage Limit | गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर, अनेक नागरिक भविष्यातील चिंतेपोटी घरात जास्तीचे सिलिंडर साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अशी साठवणूक करणे केवळ धोकादायकच नाही, तर तुम्हाला तुरुंगवारी घडवू शकते. कायद्यानुसार घरात किती गॅस सिलिंडर ठेवू शकता? याविषयी डिटेल माहिती जाणून घेऊया.
कायदेशीर नियमांनुसार घरात किती सिलिंडर ठेवता येतात आणि त्याचे नियम काय आहेत?
सामान्य घरगुती ग्राहकांसाठी तेल कंपन्यांच्या (IOCL, BPCL, HPCL) नियमांनुसार: एका घरगुती कनेक्शनवर तुम्हाला जास्तीत जास्त 2 सिलिंडर (14.2 किलोचे) ठेवण्याची परवानगी असते. यातील एक सिलिंडर शेगडीला जोडलेला असावा आणि दुसरा ‘बॅकअप’ (Spare) म्हणून ठेवता येतो. यापेक्षा जास्त सिलिंडर घरात आढळल्यास ती बेकायदेशीर साठवणूक मानली जाते.
एलपीजी गॅस हा जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडतो. त्यामुळे याची साठवणूक करणे हा गंभीर गुन्हा आहे. कलम 7: या कायद्यानुसार, जर तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त सिलिंडरची साठवणूक केली आणि दोषी आढळलात, तर 3 महिने ते 7 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. कलम 6अ: या कलमानुसार, प्रशासनाला तुमचे जास्तीचे सिलिंडर जप्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. दंड: तुरुंगवासासोबतच मोठा आर्थिक दंडही ठोठावला जाऊ शकतो.
सुरक्षिततेचे नियम
एलपीजी अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे केवळ कायदेशीरच नाही, तर सुरक्षिततेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. सिलिंडर नेहमी हवेशीर ठिकाणी ठेवावा. तो जमिनीखालील तळघरात किंवा बंद कपाटात ठेवू नये. सिलिंडर कधीही थेट सूर्यप्रकाश, विजेचे बोर्ड किंवा आगीच्या स्त्रोताजवळ नसावा. घरगुती सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणांसाठी (उदा. हॉटेल किंवा गाड्यांमध्ये) करणे हा देखील कायदेशीर गुन्हा आहे.
प्रशासनाचे आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट केले आहे की, राज्यात पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी ‘पॅनिक बुकिंग’ किंवा साठेबाजी करू नये. यामुळे गरजूंना गॅस मिळण्यास अडचण निर्माण होते आणि अपघाताचा धोकाही वाढतो.






