Tukaram Mundhe | अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर खाद्य आस्थापनांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी या नियमांची घोषणा केली असून नागरिकांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्न मिळावे हा त्यामागील मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट केले. नव्या आदेशांचे पालन सर्व संबंधित आस्थापनांसाठी बंधनकारक असणार आहे.
अन्न सुरक्षेसाठी कायमस्वरूपी मोहीम :
पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, 2011 पासून अन्न सुरक्षा संदर्भातील कायदे अस्तित्वात आहेत आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे ही विभागाची जबाबदारी आहे. अन्न पौष्टिक, सुरक्षित आणि दर्जेदार राहण्यासाठी खाद्य व्यवसाय चालवणाऱ्या सर्व आस्थापनांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
23 जून रोजी यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला आहे. अलीकडे अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. अनेक ठिकाणी अस्वच्छता, वारंवार त्याच तेलाचा वापर, अन्न साठवणुकीतील तापमान नियंत्रणाचा अभाव तसेच सुरक्षित पिण्याच्या पाण्याची कमतरता दिसून आली. या पार्श्वभूमीवर नवीन निर्देश जारी करण्यात आले असून ही तपासणी मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
Tukaram Mundhe | आस्थापनांसाठी बंधनकारक अटी
नवीन नियमांनुसार हॉटेल, उपहारगृह, कँटीन, ढाबे, क्लाउड किचन (Cloud Kitchen) आणि इतर खाद्य व्यवसायांकडे आवश्यक परवाने असणे अनिवार्य आहे. तसेच कर्मचाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी करणे आणि ग्राहकांना मोफत स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक सूचना फलकही लावावे लागतील.
याशिवाय मेन्यूमध्ये कॅलरी, पोषकतत्त्वे आणि अॅलर्जीशी संबंधित माहिती नमूद करणे आवश्यक राहील. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या नियमांचे पालन करणे, वापरलेले तेल योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि वार्षिक 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या आस्थापनांनी नियमित ऑडिट करणे आवश्यक असेल. अन्यथा संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
किचनसाठीही विशिष्ट मानके निश्चित करण्यात आली आहेत. स्वयंपाकघरातील भिंती आणि फरशी टाईल्सयुक्त तसेच धुण्यायोग्य असाव्यात. चिमणी व एक्झॉस्ट फॅनची व्यवस्था असणे आवश्यक आहे. कच्चा माल वेगळ्या जागेत साठवणे, शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ स्वतंत्र ठेवणे, ग्राहकांसाठी हँड टॉवेल उपलब्ध करणे, नियमित पेस्ट कंट्रोल करणे आणि इलेक्ट्रॉनिक फ्लाय ट्रॅप बसवणे आवश्यक राहील. तसेच किचनमध्ये झुरळे किंवा पाल नसाव्यात याची काळजी घ्यावी लागेल. अन्न साठवणीसाठी गरम पदार्थांचे तापमान 60 अंश, थंड पदार्थांचे 4 अंश आणि गोठवलेल्या पदार्थांचे तापमान उणे 18 अंश सेल्सिअस राखणे बंधनकारक करण्यात आले आहे.






