FASTag New Rules | देशभरातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 1 एप्रिलपासून FASTag संदर्भातील काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. नव्या नियमानुसार, टोल शुल्क वेळेत न भरल्यास वाहनचालकांना दुप्पट दंड भरावा लागू शकतो.
या बदलांचा उद्देश टोल वसुली अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित बनवणे हा आहे. त्यामुळे वाहनधारकांनी आपल्या फास्टॅग खात्यात पुरेशी रक्कम ठेवणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे, अन्यथा आर्थिक फटका बसू शकतो.
72 तासांत पैसे न भरल्यास दुप्पट दंड :
नवीन नियमानुसार, जर वाहनचालकाने टोल शुल्क भरले नाही तर त्याला ई-नोटीस पाठवली जाईल. ही नोटीस SMS, ईमेल किंवा मोबाइल अॅपद्वारे पाठवली जाणार आहे. या नोटीसमध्ये वाहन क्रमांक, टोल प्लाझाचे स्थान, तारीख आणि देय रक्कम याची माहिती दिली जाईल.
ई-नोटीस मिळाल्यानंतर 72 तासांच्या आत संबंधित शुल्क भरल्यास फक्त मूळ रक्कम स्वीकारली जाईल. मात्र या मुदतीत पैसे भरले नाहीत तर वाहनचालकाला मूळ टोलच्या दुप्पट रक्कम दंड म्हणून भरावी लागेल. हा नियम लागू करण्यासाठी National Highways Authority of India आणि National Payments Corporation of India यांच्या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.
FASTag New Rules | FASTag बॅलेन्स कसा तपासाल? :
वाहनचालकांनी वेळोवेळी फास्टॅग खात्यातील शिल्लक तपासणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमचा फास्टॅग एखाद्या बँकेकडून जारी केला असेल, तर त्या बँकेच्या वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवरून बॅलेन्स तपासता येतो.
तसेच Paytm, PhonePe किंवा Airtel Payments Bank यांसारख्या वॉलेट अॅपमध्येही फास्टॅगची शिल्लक सहज पाहता येते. याशिवाय MyFASTag या अधिकृत अॅपमधूनही खाते व्यवस्थापन आणि रिचार्ज करता येतो.
वाहनचालकांना लॉगिन न करताही शिल्लक तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे. नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून मिस्ड कॉल देऊन, SMS अलर्टद्वारे किंवा हेल्पलाइन 1033 वर कॉल करूनही माहिती मिळू शकते. त्यामुळे वाहनचालकांनी वेळेत बॅलेन्स तपासून ठेवणे आवश्यक आहे.






