‘त्या’ एका अटीने सरकार हतबल! कर्जमाफी आंदोलनामुळे ४ महामार्ग ठप्प, बच्चू कडूंचा थेट इशारा

On: October 29, 2025 11:58 AM
Bacchu Kadu
---Advertisement---

Bacchu Kadu | शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नेतृत्वाखालील विराट मोर्चा आज नागपुरात दाखल झाला आहे. या आंदोलनामुळे नागपूर-वर्धा, नागपूर-जबलपूर आणि परिसरातील एकूण चार महामार्ग बंद झाले आहेत. हजारो शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. आंदोलनकर्ते नागपूरमध्येच बैठकीवर ठाम असून, सरकार चर्चेसाठी मुंबईला बोलावत आहे.

पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी नागपूर-वर्धा महामार्गावर कडक बंदोबस्त ठेवला आहे. शेतकऱ्यांनी रस्त्यावरच न्याहारी केली असून, आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात फोनवरून संवाद झाला. मात्र बैठकीच्या स्थळावरून दोघांमध्ये मतभेद कायम आहेत.

बच्चू कडू ठाम — “नागपुरातच बैठक घ्या” :

बच्चू कडू यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की, “आमचे आंदोलन सुरू असताना आम्ही मुंबईला येऊ शकत नाही. नागपूरलाच मंत्रालय आहे, तिथे बैठक घ्या. जातीयवादी मोर्चात जाता येतं, पण शेतकऱ्यांच्या मोर्चात येणं सरकारला जड जातं का?” असा सवाल त्यांनी केला. त्यांनी पुढे सांगितले की, यापूर्वी दोन बैठका झाल्या पण त्यातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काहीच निकाल लागला नाही.

त्यांनी पुढे आरोप केला की, “विमानातून मुंबईला ये-जा करण्यात पूर्ण दिवस जातो, ज्यामुळे आंदोलन हातात राहणार नाही. तुम्ही बैठकीच्या नावाने आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत आहात,” असा थेट आरोप बच्चू कडूंनी सरकारवर केला.

Bacchu Kadu | सरकार चर्चेसाठी तयार — बावनकुळे यांचे स्पष्टीकरण :

दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrshekhar bawankule) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “आम्ही 26 ते 28 ऑक्टोबरदरम्यान बच्चू कडू आणि इतर नेत्यांशी संवाद साधला होता. त्यांनी बैठकीला येण्याचे आश्वासन दिले होते. पण आता ते आले नाहीत. त्यांनी किमान एका प्रतिनिधीला तरी मुंबईतील बैठकीसाठी पाठवावे,” अशी विनंती त्यांनी केली.

बावनकुळे यांनी सांगितले की, “सरकार चर्चेसाठी तयार आहे. आम्ही कुणाला अटक करत नाही, फक्त संवादासाठी बोलावत आहोत. आम्ही मुघल विचाराचे नाही. चर्चेतूनच तोडगा निघेल,” असं म्हणत त्यांनी बच्चू कडूंचे आरोप फेटाळले.

तोडगा चर्चेतूनच, पण बैठक कुठे? :

सध्या परिस्थिती अशी आहे की, बच्चू कडू आणि आंदोलक शेतकरी नागपुरातच बैठक घेण्यावर ठाम आहेत, तर सरकार आणि भाजप नेते मुंबईतील उच्चस्तरीय बैठकीवर आग्रह धरत आहेत. त्यामुळे आंदोलनाचा तोडगा कधी आणि कसा निघणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नागपुरातील आंदोलन तीव्र होत असताना राज्य सरकारवर दबाव वाढला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या आणि बैठकीच्या स्थळावरील वादामुळे हे आंदोलन आगामी दिवसांत आणखी पेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

News Title: Farm Loan Waiver Protest: 4 Highways Blocked as Bacchu Kadu Insists on Nagpur Meeting; Government on the Backfoot!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now