Maharashtra | महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पुरामुळे आर्थिकदृष्ट्या कोलमडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठा दिलासा देणारी घोषणा करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पावसाने हाहाकार उडवत हजारो हेक्टर शेती उद्ध्वस्त केली. अनेक ठिकाणी पिकांसोबतच शेतजमिनीच वाहून गेल्या. अशा गंभीर परिस्थितीत फडणवीस (Devendra fadanvis) सरकारने पूरग्रस्त आणि खरडलेल्या जमिनींसाठी मोफत माती, गाळ, मुरूम आणि कंकर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
राज्यातील महसूल खात्याच्या मार्गदर्शनाखाली या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पुरामुळे 10 ते 15 फूट खोलपर्यंत खरडून गेल्या आहेत, त्यांना शेतजमिनींची सुपीकता पुनर्संचयित करण्यासाठी आवश्यक ते सर्व गौण खनिज रॉयल्टीशिवाय पुरवले जाणार आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेती पुन्हा उभ्या राहण्यास मोठी मदत मिळणार आहे.
तात्काळ अंमलबजावणीचा आदेश :
सोलापूर जिल्ह्यासह (Solapur) राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे नदीचा प्रवाह बदलला, शेतात खोल खड्डे पडले आणि पिके पूर्णपणे वाहून गेली. सीना नदीला आलेल्या महापुराने तर पिकांसोबत जमिनीही उध्वस्त केल्या. अशाच परिस्थितीचा सामना मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना करावा लागला. शेतकऱ्यांच्या या वेदनादायी परिस्थितीत सरकारने दिलेला हा दिलासा मोठा आधार ठरणार आहे.
महसूल खात्याने निर्देश दिले आहेत की जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ सर्वेक्षण करून पात्र शेतकऱ्यांना माती, मुरूम आणि गाळ उपलब्ध करून द्यावा. पुरामुळे होणाऱ्या जमिनीच्या धूपीसाठी सरकारकडून ही मदत मोफत दिली जाणार आहे, ज्यामुळे शेतजमिनींचे पुनर्वसन वेगाने होऊ शकणार आहे. शेतकऱ्यांना हंगाम वाया गेल्यानंतर आता पुढील पिकांसाठी जमिनीची तयारी करण्यास या निर्णयामुळे मोठा फायदा होईल.
Maharashtra | कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान? चिंताजनक आकडे :
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल 30 जिल्ह्यांतील 1,785,714 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेषतः खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मका, तूर, उडीद, भाजीपाला, फळपिके, ऊस, कांदा आणि हळद यांना मोठा फटका बसला आहे.
सर्वाधिक नुकसान झालेले जिल्हे खालीलप्रमाणे आहेत:
नांदेड – 728,049 हेक्टर
यवतमाळ – 318,860 हेक्टर
वाशीम – 203,098 हेक्टर
धाराशिव – 157,610 हेक्टर
अकोला – 177,466 हेक्टर
सोलापूर – 47,266 हेक्टर
बुलढाणा – 89,782 हेक्टर
एकूण 195 तालुके आणि 654 महसूल मंडळे अतिवृष्टीमुळे बाधित झाली असून, शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. यामुळे सरकारचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठा श्वास आणि पुनरुत्पादनात्मक शेतीसाठी नवी आशा आहे.






