Govind Barge Death | बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसाला गावात घडलेली एक धक्कादायक घटना सध्या चर्चेत आहे. गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (वय 34) (Govind Barge) यांनी थेट स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवले. या घटनेमागे प्रेमसंबंधातील वाद कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गोविंद बर्गे हे एका 21 वर्षीय नर्तकीच्या प्रेमात आकंठ बुडाले होते, मात्र अचानक तिच्या वागणुकीमुळे निर्माण झालेल्या वादातून या घटनेला वाव मिळाला.
प्रेमात पडलेल्या व्यक्तीने काय टोकाचे पाऊल उचलावे हे सांगणे अवघड असते. गोविंद बर्गे (Govind Barge) यांचेही असेच झाले. ते प्लॉटिंगच्या व्यवसायातून मोठे पैसे कमवत होते. गेवराईमध्ये त्यांचा मोठा बंगला, शेती आणि संपत्ती होती. तरीदेखील कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड (Pooja Gaikwad) हिच्या प्रेमात ते अडकले. तिला त्यांनी महागडा मोबाईल आणि सोन्याचे दागिने भेट दिले. मात्र अचानक पूजाने त्यांच्याशी बोलणे बंद केल्याने वादाची ठिणगी पडली.
प्रेमातून निर्माण झाला वाद :
गोविंद आणि पूजामध्ये संबंध घट्ट होत असताना अचानक पूजाने त्यांच्याशी संपर्क तोडला. अनेक प्रयत्न करूनही पूजा बोलत नव्हती. एवढेच नव्हे तर, असे सांगितले जाते की गेवराईतील बंगला स्वत:च्या नावावर करावा म्हणून पूजाने गोविंदवर दबाव आणला होता. यावरून त्यांच्यात अनेकदा वाद झाले. पूजाच्या या वागण्यामुळे गोविंद मानसिकदृष्ट्या व्यथित झाले होते. (Ex Sarpanch Govind Barge Case)
गोविंद यांचे लग्न झाले होते आणि त्यांना एक मुलगा व मुलगीही आहेत. तरीदेखील नर्तकीवरील आकर्षणाने ते इतके वेडे झाले की, संसाराचा विसर पडला. गावातील लोकांच्या चर्चेनुसार पूजाने वारंवार धमक्या दिल्याने गोविंद तणावाखाली होते.
गाडीत बसून संपवले आयुष्य :
शेवटी त्रस्त झालेल्या गोविंद बर्गे यांनी थेट पूजाच्या बार्शी तालुक्यातील सासरच्या घरी जाऊन भेट घेतली. मात्र भेटीत समाधान न झाल्याने त्यांनी घराबाहेर गाडीत बसून आतून लॉक केले आणि पिस्तुलातून स्वत:वर गोळी झाडली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
या प्रकारानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. ही घटना नेमकी काय आहे याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, गावात या घटनेवरून जोरदार चर्चा सुरू असून नर्तकी व माजी उपसरपंच यांच्यातील वादाचे विविध पैलू पुढे येत आहेत.






