EPFO Interest Rate | देशभरातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी भविष्यनिर्वाह निधी खात्याबाबत दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ईपीएफ खात्यावर अधिक व्याजदर मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यासाठी गुंतवणुकीचे पर्याय नव्याने तपासले जात आहेत. यासंदर्भात लवकरच महत्त्वाचा निर्णय होण्याची चिन्हे दिसत आहेत.
गुंतवणूक धोरणाचा पुनर्विचार सुरू :
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (Employees’ Provident Fund Organisation – EPFO) आपल्या गुंतवणूक पद्धतीचा सखोल आढावा घेण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. सुमारे ३० कोटींहून अधिक सदस्यांच्या जवळपास ३१ लाख कोटी रुपयांच्या निधीचे व्यवस्थापन करणारी ही संस्था अधिक परतावा देणारे पर्याय शोधत आहे. अलीकडील बैठकीत इक्विटी मार्केट आणि ईटीएफमध्ये (Exchange Traded Funds – ETF) गुंतवणूक वाढवण्याबाबत चर्चा झाली होती. या माध्यमातून जास्त नफा मिळाल्यास सदस्यांच्या खात्यात व्याजासह अतिरिक्त रक्कम जमा होऊ शकते. (EPFO Interest Rate)
मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी झालेल्या बैठकीत सरकारी प्रतिनिधीही उपस्थित होता आणि त्यानेच समिती गठित करण्याचा प्रस्ताव मांडला. या समितीत इतर सरकारी विभागांतील अधिकाऱ्यांचाही समावेश करण्याची शक्यता आहे. सध्या एप्रिल २०१५ च्या अधिसूचनेनुसार गुंतवणूक केली जाते. त्यानुसार ४५ ते ६५ टक्के निधी सरकारी रोखे आणि योजनांमध्ये गुंतवला जातो, २० ते २५ टक्के कॉर्पोरेट डेट पेपर्समध्ये, तर सुमारे ५ टक्क्यांपर्यंत निधी अल्पकालीन योजनांमध्ये ठेवला जातो. तसेच इंडेक्स फंड्समार्फत ५ ते १५ टक्के रक्कम इक्विटीजमध्ये गुंतवली जाते.
EPFO Interest Rate | सदस्यांसाठी वाढीव सुविधा आणि तांत्रिक बदल :
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण निधीपैकी जवळपास ८८ टक्के हिस्सा सरकारी बाँड्समध्ये आणि १०.६ टक्के हिस्सा इक्विटीजमध्ये गुंतवलेला आहे. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी पीएफ ही बंधनकारक बचत योजना आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनातून १२ टक्के रक्कम कपात केली जाते आणि नियोक्ताही तितकीच रक्कम जमा करतो. कर्मचाऱ्याच्या वाट्यातील ८.३३ टक्के हिस्सा कर्मचारी पेन्शन योजनेत (Employees’ Pension Scheme – EPS) वर्ग केला जातो, तर उर्वरित रक्कम ईपीएफ खात्यात जमा होऊन त्यावर व्याज दिले जाते.
तांत्रिक सुधारणा करण्याच्या दिशेनेही पावले उचलली जात आहेत. एप्रिलपासून युपीआय (Unified Payments Interface – UPI) च्या माध्यमातून पीएफ रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच लवकरच एटीएमद्वारेही पैसे काढण्याची सोय सुरू करण्याची तयारी आहे. उमंग (UMANG) अॅपवर फेस ऑथेंटिकेशनच्या साहाय्याने लॉग-इन करण्याची सुविधाही दिली जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सदस्यांना अधिक सुलभ आणि वेगवान सेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.






