EPFO | देशातील कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आता मोठ्या बदलाचा विचार करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, EPFO अंतर्गत PF आणि पेन्शन योजनांसाठी लागू असलेली सध्या 15,000 रुपये असलेली बेसिक वेतन मर्यादा वाढवण्याची शक्यता आहे. जर हा बदल लागू झाला तर लाखो कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळू शकणार आहे.
कामगार संघटना आणि कर्मचाऱ्यांकडून अनेक वर्षांपासून या बदलाची मागणी होत होती. आता सरकार या प्रस्तावावर गंभीरपणे विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते हा निर्णय लागू झाल्यास खासगी क्षेत्रातील मोठा कर्मचारी वर्ग यातून लाभार्थी ठरणार आहे.
काय बदल होणार? :
सध्या EPFO च्या नियमानुसार, ज्या कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतन 15,000 रुपयांपर्यंत आहे त्यांनाच PF आणि EPS योजनेचा लाभ मिळतो. यापेक्षा वेतन जास्त असल्यास कंपनीवर PF देण्याची सक्ती नसते. त्यामुळे अनेकांना सेवानिवृत्तीचे आर्थिक संरक्षण मिळत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, EPFO ही मर्यादा 15,000 रुपयांहून वाढवून 25,000 रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवणार आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेसाठी मांडला जाण्याची शक्यता आहे.
EPFO | कोणाला फायदा होईल? :
या प्रस्तावामुळे देशातील सुमारे 1 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना PF आणि पेन्शन योजनांचा थेट लाभ मिळू शकेल, असा अंदाज आहे. बेसिक वेतन वाढल्याने योगदानाची रक्कम वाढणार असून EPFO चा फंडही अधिक मजबूत होणार आहे. तसेच कर्मचारी भविष्य निधी अधिक सुरक्षित आणि दीर्घकालीन सेवानिवृत्ती नियोजनासाठी उपयुक्त ठरणार आहे.
वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू यांनी अलीकडेच झालेल्या कार्यक्रमात सांगितले की, सध्या 15,000 रुपयांहून अधिक वेतन असणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना पेन्शनचे संरक्षण उपलब्ध नाही. त्यामुळे वयोमानानंतर त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.






