Emergency Oil Reserves | जगभरात वाढत्या तेलदरांमुळे नागरिक आणि उद्योग दोघेही चिंतेत असताना आता एक मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था International Energy Agency (IEA) ने जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा वाढवण्यासाठी आपले आपत्कालीन साठे उघडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे तेलाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण येण्याची शक्यता असून भारतासारख्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, IEA च्या सदस्य देशांनी बाजारातील तुटवडा भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचा साठा सोडण्याचे मान्य केले आहे. प्रस्तावित साठ्यातील सुमारे 72 टक्के कच्चे तेल, तर उर्वरित 28 टक्के तेल उत्पादने असतील. वाढत्या किमती रोखण्यासाठी सरकारांनी उद्योगांच्या अनिवार्य साठ्यातून 116.6 दशलक्ष बॅरल आणि खाजगी साठ्यातून 271.7 दशलक्ष बॅरल तेल उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
प्रादेशिक तेल पुरवठ्यासाठी मास्टर प्लॅन
IEA च्या माहितीनुसार, केवळ अमेरिकेतील सदस्य देश 172.2 दशलक्ष बॅरल तेल बाजारात आणणार आहेत. त्यामुळे जागतिक पुरवठा साखळी अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. आशिया-ओशनिया प्रदेशातील देश तात्काळ साठा उपलब्ध करून देणार असून युरोप आणि अमेरिका येथून मार्च अखेरीस पुरवठा सुरू होणार आहे.
या निर्णयामुळे केवळ तेलाचे दर स्थिर राहण्यास मदत होणार नाही, तर युद्धामुळे निर्माण झालेली अनिश्चितताही कमी होईल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे. विशेषतः ऊर्जा गरजांसाठी आयातीवर अवलंबून असलेल्या देशांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.
दरम्यान, मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरही भारतीय ध्वजांकित कच्च्या तेलाचा टँकर “जग लडकी” सुरक्षितपणे भारताकडे रवाना झाला आहे. हा टँकर Fujairah Port येथे तेल भरत असताना 14 मार्च 2026 रोजी टर्मिनलवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली होती. धोकादायक परिस्थिती असूनही जहाजाने कोणतेही नुकसान न होता लोडिंग पूर्ण केले आणि भारताकडे मार्गस्थ झाले. युद्धग्रस्त परिसरातून सुरक्षितपणे बाहेर पडणारे हे चौथे भारतीय जहाज असल्याने भारताच्या ऊर्जा सुरक्षेला मोठा दिलासा मिळाला आहे.
“जग लडकी” टँकर भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता फुजैराहहून रवाना झाला. जहाजात सुमारे 80,800 टन मुरबान कच्चे तेल भरलेले आहे. जहाजावरील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित असून सरकार सागरी मार्गांच्या सुरक्षिततेवर सतत लक्ष ठेवून आहे. पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता, देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा अखंडित राहावा यासाठी सरकारकडून सर्व आवश्यक पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.






