Ladki Sun Yojana | राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी शिवसेनेने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. घरगुती हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि महिलांना तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी नुकतेच ‘लाडकी सून योजना’ जाहीर केली. ठाण्यात झालेल्या एका भव्य कार्यक्रमात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
याआधी सुरू केलेल्या ‘लाडकी बहीण योजने’च्या यशानंतर ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. ज्या सुनांना सासरी मानसिक किंवा शारीरिक छळ सहन करावा लागतो, त्यांना त्वरित मदत मिळावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
प्रत्येक सून ही लाडकीच – शिंदेंचा संदेश :
एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले की, “जशी आपली मुलगी असते, तशीच सूनही असते. तिलाही आदर आणि सन्मान मिळायला हवा. अनेक घरांमध्ये सुनांवर अत्याचार होतात, त्याला आता पूर्णविराम द्यायचा आहे. यासाठीच ही योजना सुरू केली आहे.”
या योजनेत केवळ पीडित महिलांना मदत केली जाणार नाही, तर चांगल्या सासूंचाही सन्मान करण्यात येणार आहे. यामुळे समाजात सकारात्मक संदेश जाईल आणि सासू-सुनेमधील नाते दृढ होईल, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.
Ladki Sun Yojana | महिलांसाठी विशेष हेल्पलाईन नंबर :
या योजनेअंतर्गत, घरगुती हिंसाचाराचा सामना करणाऱ्या महिलांसाठी 8828862288 हा हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आला आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यास पीडित महिलांना तातडीने मदत मिळेल.
राज्यभरातील शिवसेना शाखा आणि कार्यालयांमार्फत ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सुरुवातीला समुपदेशनाद्वारे समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. जर हा मार्ग निष्फळ ठरला, तर पुढे आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.
राज्यस्तरीय जबाबदारी मीनाक्षी शिंदेकडे :
या योजनेची राज्यस्तरीय जबाबदारी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर ही मोहीम प्रभावीपणे राबवली जाणार आहे. (Ladki Sun Yojana)
प्रत्येक जिल्ह्यातील शिवसेना शाखा या उपक्रमात सहभागी होऊन सुनांना न्याय मिळवून देण्यासोबतच घरगुती समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत.






