Dubai Airport Drone Attack : धक्कादायक! दुबई विमानतळाजवळ ड्रोन हल्ला, एका भारतीयासह 4 जण जखमी

On: March 11, 2026 3:07 PM
Dubai Airport Drone Attack
---Advertisement---

Dubai Airport Drone Attack| इराण-अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील महायुद्धाचे पडसाद आता जगातील सर्वात सुरक्षित आणि गजबजलेल्या शहरांपैकी एक असलेल्या ‘दुबई’तही उमटू लागले आहेत. इराणने आखाती देशांवर आपले हल्ले तीव्र केले असून, नुकतीच दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.

विमानतळाजवळ नेमकं काय घडलं?
दुबई मीडिया ऑफिसने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, दुबई विमानतळाच्या परिसरात दोन ड्रोन कोसळले आहेत. या दुर्घटनेत एकूण चार जण जखमी झाले असून, त्यात एका भारतीय नागरिकाचाही समावेश आहे. सुदैवाने या भारतीय नागरिकाला केवळ किरकोळ दुखापत झाली आहे. याशिवाय, घानाचे दोन आणि बांगलादेशचा एक नागरिक यामध्ये जखमी झाला आहे.

हे ड्रोन थेट इराणमधून आले होते की युएईच्या सुरक्षा यंत्रणेने ते हवेतच पाडल्यामुळे त्यांचे अवशेष खाली पडले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या घटनेनंतर संपूर्ण दुबईत ‘हाय अलर्ट’ (High Alert) जारी करण्यात आला आहे. एवढी मोठी घटना घडूनही दुबई विमानतळावरील विमानसेवा विस्कळीत झालेली नाही आणि सर्व उड्डाणे सध्या सुरळीत सुरू आहेत.

28 फेब्रुवारी 2026 रोजी हे युद्ध सुरू झाल्यापासून इराणने सौदी अरेबिया, युएई, कतार, बहरीन आणि कुवेत या देशांवर शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले आहेत. युएईची ‘एअर डिफेन्स सिस्टिम’ बहुतांश हल्ले हवेतच नष्ट करत असली, तरी काही हल्ले जमिनीवर पोहोचत आहेत. याच मालिकेत अबू धाबी येथील ‘रुवैस रिफायनरी’वरही नुकताच ड्रोन हल्ला झाला. तिथे लागलेल्या भीषण आगीमुळे ती रिफायनरी बंद करावी लागली आहे.

या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकार आणि दुबईतील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. युएईमध्ये (विशेषतः दुबई आणि अबू धाबी) राहणाऱ्या लाखो भारतीयांना अत्यंत सतर्क राहण्याचा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Join WhatsApp Group

Join Now