दारू पिऊन गाडी चालवणं पडलं चांगलंच महागात; पिंपरी न्यायालयाने दिली अनोखी शिक्षा

On: October 30, 2025 1:17 PM
Drunk Driver Punishment
---Advertisement---

Drunk Driver Punishment | पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) परिसरात दारू पिऊन वाहन चालवणे एका चालकाला चांगलेच महागात पडले आहे. पिंपरी मोटार न्यायालयाने (Pimpri Motor Court) या प्रकरणात केवळ दंड ठोठावून न थांबता, चालकाला सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारी एक अभिनव शिक्षा सुनावली आहे, ज्यामुळे परिसरात या शिक्षेची जोरदार चर्चा सुरू आहे.

दंडासोबत समाजप्रबोधनाचा आदेश :

हिंजवडी (Hinjawadi) परिसरात २२ जुलै रोजी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी (Pimpri-Chinchwad Traffic Police) एका वाहन चालकाला दारूच्या नशेत गाडी चालवताना पकडले होते. मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अंतर्गत त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी पिंपरी न्यायालयात झाली. न्यायालयाने चालकाला दोषी ठरवत दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला.

मात्र, न्यायालयाने केवळ दंडावरच न थांबता एक वेगळा आदेशही दिला. दारू पिऊन वाहन चालवण्याचे गंभीर परिणाम दर्शवणारे एक हजार हस्तपत्रके (Handbills) तयार करून, ती पुढील १५ दिवस शहरातील गर्दीच्या ठिकाणी वाटण्याचे आदेश न्यायालयाने दिले. जर चालकाने हा दंड भरला नाही किंवा हस्तपत्रके वाटली नाहीत, तर त्याला ९० दिवसांच्या साध्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

Drunk Driver Punishment | वाढत्या अपघातांवर न्यायालयाची चिंता आणि पोलिसांचे आवाहन :

पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील (Vivek Patil) यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले, “ही शिक्षा केवळ दंडात्मक नसून, त्यात समाजोपयोगी दृष्टिकोन आहे. न्यायालयाचा उद्देश गुन्हेगारास केवळ दंड देणे नसून, त्याच्यात जबाबदारीची भावना निर्माण करणे हा आहे.” दारू पिऊन वाहन चालवल्याने होणारे अपघात आणि त्यामुळे होणारी जीवितहानी ही गंभीर समस्या बनली आहे.

जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या नऊ महिन्यांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २,९८४ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या कडक कारवाईची आणि जनजागृतीची गरज असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांनी नागरिकांना मद्यपान करून वाहन न चालवण्याचे आणि वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

News title : Drunk Driver Gets Unique Court Punishment

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now