Disha Salian | दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात तिचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या याचिकेमुळे शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर थेट आरोप करण्यात आले आहेत, ज्यामुळे राजकारणात नव्याने खळबळ माजली आहे.
सतीश सालियन यांचं मोठं विधान
सतीश सालियन यांना विचारण्यात आलं की, गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांच्यावर कुठलाही दबाव होता का आणि त्यांनी पोलिसांसमोर सगळं स्पष्ट सांगितलं असतानाही ते गप्प का राहिले? यावर उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केलं की, त्यांच्या वर कोणाचाही दबाव नव्हता. ते म्हणाले की, त्या घटनेवेळी नक्की काय घडलं हे त्यांना माहीत नव्हतं आणि त्यांना काही गोष्टी नंतर समजल्या.
तसेच, या प्रकरणातील अनेक पुरावे एक-दोन वर्षांपूर्वीच समोर आले असल्याचं ते म्हणाले. याआधी त्यांना या बाबींची कल्पना नव्हती. त्यांनी एसआयटीकडे (SIT) निवेदन दिलं होतं की, योग्य ती कारवाई त्यांनी करावी. पुन्हा एकदा त्यांनी ठामपणे सांगितलं की, कोणत्याही राजकीय किंवा प्रशासकीय व्यक्तीकडून त्यांच्यावर दबाव आणला गेला नव्हता.
पोलीस आयुक्तांची भेट आणि गंभीर मागण्या
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सतीश सालियन यांनी आज मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त यांची भेट घेतली. त्यांच्याकडून नेमकी काय मागणी करण्यात आली हे त्यांचे वकील निलेश ओझा यांनी सांगितलं. त्यांनी स्पष्ट केलं की, सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह इतर काही व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याची विनंती केली आहे.
या यादीत माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांचाही समावेश आहे. या मागण्येमुळे प्रकरण आणखीनच गुंतागुंतीचं झालं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला जोर चढला असून, दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे.
Title: Disha Salian Case Reignites Political Storm






