नसरापूर अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा! कोर्टाचा अत्यंत मोठा

On: June 29, 2026 12:26 PM
Narsapur Case
---Advertisement---

Narsapur Case | पुणे (Pune) जिल्ह्यातील भोर (Bhor) तालुक्यातील नसरापूर (Narsapur) येथे घडलेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे (Bhimrao Kamble) याला विशेष न्यायालयाने दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे राज्यभर गाजलेल्या या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

विशेष न्यायालयाचा कठोर निर्णय

1 मे 2026 रोजी घडलेल्या या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. आरोपी भीमराव कांबळे याने खाऊ देण्याचे आमिष दाखवून साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी त्याने चिमुकलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवला होता. तपासादरम्यान समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी चिमुकलीचा हात धरून नेत असल्याचे स्पष्ट दिसून आले. या महत्त्वाच्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुलीही दिली होती. विशेष म्हणजे, आरोपीच्या कुटुंबीयांनीही त्याच्यावर कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली होती.

यापूर्वीच्या सुनावणीत न्यायालयाने भीमराव कांबळेला दोषी ठरवले होते. मात्र शिक्षेबाबतचा अंतिम निर्णय 29 जूनसाठी राखून ठेवण्यात आला होता. अखेर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा जाहीर केली. सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी या गुन्ह्याचे अत्यंत क्रूर स्वरूप अधोरेखित करत उपलब्ध पुरावे आणि परिस्थितीजन्य बाबींचा विचार करून हा निर्णय दिल्याचे नमूद केले. निकालाच्या वेळी न्यायालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Narsapur Case | राज्यभरातून फाशीच्या शिक्षेची मागणी :

या प्रकरणात चिमुकलीच्या आई-वडिलांनी सुरुवातीपासूनच आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. न्यायालयात निकालाच्या वेळी तेही उपस्थित होते. आरोपीला जन्मठेप की मृत्युदंड, याबाबत गेल्या काही दिवसांपासून राज्यभर चर्चा सुरू होती. अखेर न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावत या चर्चेला पूर्णविराम दिला.

या अमानुष घटनेनंतर राज्यातील विविध भागांत मोर्चे आणि आंदोलनांचे आयोजन करण्यात आले होते. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांसह विविध सामाजिक संघटनांनी केली होती. अनेक राजकीय नेत्यांनीही पीडित कुटुंबाची भेट घेत त्यांना न्याय मिळावा, अशी भूमिका मांडली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने तत्सम गुन्ह्यांतील निर्णयांचा संदर्भ घेत आरोपीविरोधातील पुरावे ठोस असल्याचे नमूद केले आणि त्याआधारे फाशीची शिक्षा सुनावली.

News Title: Death Sentence In Narsapur Case

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now