Crude Oil Price | मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता जागतिक ऊर्जा बाजारावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी आली असून त्या 107 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत. या वाढीमुळे जगभर महागाई वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
युद्धामुळे तेल बाजारात मोठी उसळी :
इराण (Iran), अमेरिका (United States) आणि इस्रायल (Israel) यांच्यातील वाढत्या तणावाचा थेट परिणाम जागतिक कमोडिटी मार्केटवर झाला आहे. संघर्षाच्या दहाव्या दिवशी झालेल्या तीव्र हल्ल्यांनंतर सोमवारी कच्च्या तेलाच्या दरांमध्ये सुमारे 17 टक्क्यांची झपाट्याने वाढ झाली. काही दिवसांपूर्वी 90 ते 92 डॉलर दरम्यान असलेले ब्रेंट क्रूड आता थेट 106.92 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. साडेतीन वर्षांनंतर प्रथमच या तेलाने 107 डॉलरचा टप्पा ओलांडल्याने जागतिक बाजारपेठेत अस्थिरता वाढली आहे.
अमेरिकन डब्ल्यूटीआय क्रूडमध्येही मोठी वाढ दिसून आली असून त्याचा दर 17.23 टक्क्यांनी वाढून 106.56 डॉलरपर्यंत गेला आहे. इराणने कुवैत (Kuwait), कतार (Qatar) आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अमेरिकेच्या तळांना लक्ष्य केल्यामुळे तेल पुरवठ्याच्या साखळीवर दबाव निर्माण झाला आहे. जगातील सुमारे 20 टक्के तेल वाहतूक ज्या स्ट्रेट ऑफ होर्मुज (Strait of Hormuz) मार्गातून होते, तो मार्ग बंद करण्याची धमकी देण्यात आल्याने जागतिक बाजारात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
Crude Oil Price | जागतिक महागाईची शक्यता, भारताला दिलासा :
या परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी तेलाच्या किमतीतील वाढ तात्पुरती असल्याचे म्हटले आहे. इराणच्या आण्विक धोक्याचा सामना करण्यासाठी ही किंमत मोजावी लागत आहे आणि परिस्थिती स्थिर झाल्यावर दर पुन्हा कमी होतील, असा दावा त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये केला आहे. मात्र अमेरिकेत पेट्रोलच्या किमती आधीच 47 सेंटने वाढून प्रति गॅलन 3.45 डॉलरवर पोहोचल्या आहेत. तज्ज्ञांचे मत आहे की कच्चे तेल 100 डॉलरच्या वर टिकून राहिले तर जगभर महागाईची नवी लाट येऊ शकते.
दरम्यान, जागतिक बाजारात तणाव असला तरी भारतासाठी काही प्रमाणात दिलासादायक संकेत आहेत. सरकारी मिळालेल्या माहितीनुसार सध्याच्या परिस्थितीत देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. शेजारील देश आणि युरोपमध्ये तेलाचे दर झपाट्याने वाढत असताना भारताने ऊर्जा साठे मजबूत ठेवले असून विविध स्रोतांमधून पुरवठा सुनिश्चित केला आहे. अलीकडील आढावा बैठकीत देशातील तेल आणि एलपीजी साठे सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जागतिक संकट असूनही सध्या तरी भारतातील ग्राहकांना पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा थेट फटका बसण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत मिळत आहेत.






