Siya Goyal | लोहगड (Lohagad) येथील केतन अग्रवाल (Ketan Agarwal) हत्या प्रकरणात मोठी न्यायालयीन घडामोड समोर आली आहे. मुख्य आरोपी सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरी (Chetan Chaudhary) यांची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी न्यायालयाने नाकारली असून दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या निर्णयामुळे आरोपींना जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग खुला झाला असून तपास यंत्रणेला मोठा धक्का मानला जात आहे.
पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी फेटाळली :
पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा, आरोपींनी सराव केल्याचा संशय असलेल्या ठिकाणाचा पंचनामा, पासपोर्ट फाडण्यात आल्याच्या जागेचा पंचनामा आणि जप्त केलेल्या कपड्यांची माहिती न्यायालयासमोर मांडली. तसेच दोघांच्या मोबाईलमधील डेटा मिळाल्याचे सांगत त्याची परस्पर पडताळणी करण्यासाठी आणखी चौकशी आवश्यक असल्याचा दावा करण्यात आला.
तपासादरम्यान मोबाईलमधून पुनर्प्राप्त करण्यात आलेल्या माहितीमध्ये सांकेतिक भाषेचा वापर झाल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. या संभाषणांचा अर्थ समजून घेण्यासाठी दोन्ही आरोपींची समोरासमोर चौकशी आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. याशिवाय या कटात आणखी एखाद्या जवळच्या व्यक्तीचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू असल्याचे सांगत पोलिसांनी तीन दिवसांची अतिरिक्त पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. सरकारी वकिलांनीही या मागणीचे समर्थन करत दुसरा मोबाईल, रिकव्हर झालेला डेटा आणि सांकेतिक संदेशांची पडताळणी पूर्ण करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद केला.
Siya Goyal | बचाव पक्षाचा युक्तिवाद ठरला प्रभावी :
सिया गोयल यांच्या वतीने बाजू मांडणारे वकील विपुल दूशिंग (Vipul Dushing) यांनी तपासात सिया पूर्ण सहकार्य करत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तिचा मोबाईल आधीच पोलिसांच्या ताब्यात असून त्यातील माहिती उपलब्ध असल्यामुळे केवळ सांकेतिक संदेशांचा अर्थ लावण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले. अशा कारणांवर पोलीस कोठडी देणे कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
चेतन चौधरी यांच्या वकिलांनीही केवळ शक्यतांच्या आधारावर पोलीस कोठडी देता येत नसल्याचा युक्तिवाद केला. यावर सरकारी पक्षाने सांकेतिक चिन्हे आणि निकनेमचा वापर का करण्यात आला, याची उत्तरे केवळ आरोपीच देऊ शकतात, असे सांगितले. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद स्वीकारला नाही. तसेच नार्को चाचणीसाठी आरोपींची संमती आवश्यक असल्याचे स्पष्ट करत पोलीस कोठडीची मागणी अपुरी कारणे असल्यामुळे फेटाळून लावली. परिणामी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून आता त्यांच्यासाठी जामिनाचा अर्ज करण्याचा मार्ग खुला झाला आहे.






