Sunil Tatkare | बारामती (Baramati) विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या राजकीय समीकरणात मोठा बदल झाला आहे. काँग्रेस (Congress) पक्षाने या निवडणुकीतून आपला उमेदवार मागे घेतल्याची घोषणा केली आहे. या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी काँग्रेसच्या निर्णयाचे स्वागत करत आभार व्यक्त केले आहेत.
काँग्रेसने उमेदवारी मागे घेतली :
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सुरुवातीला काँग्रेसनेही या मतदारसंघात उमेदवार उभा केला होता. मात्र नंतर काँग्रेसने या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर केला. त्यानुसार काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या आकाश मोरे (Akash More) यांनी अधिकृतपणे आपली उमेदवारी मागे घेतली. या घडामोडीनंतर बारामतीतील राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आले आहे.
Sunil Tatkare | तटकरे यांनी मानले काँग्रेसचे आभार :
या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना सुनील तटकरे यांनी काँग्रेसच्या भूमिकेचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, काँग्रेसने मोठेपणा दाखवत बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतली असून त्याबद्दल ते पक्षाचे आभारी आहेत. तसेच अजित पवार यांनी 1991 आणि 1992 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली.
तटकरे यांनी पुढे सांगितले की, 1999 ते 2014 या काळात राज्यात लोकशाही आघाडी सरकार असताना काँग्रेससोबत काम करत अजित पवार यांनी मंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने दाखवलेला समन्वयाचा दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचे त्यांनी म्हटले.
याशिवाय त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भूमिकेचाही उल्लेख केला. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, असा त्यांचा दृष्टिकोन असल्याचे तटकरे म्हणाले. तसेच उमेदवारी मागे घेण्याच्या मुद्द्यावर त्यांनी आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्याशी संपर्क साधल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान राष्ट्रवादी सध्या एनडीए (NDA) सोबत सत्तेत असल्यामुळे काँग्रेसकडून टीका होत होती. यावर बोलताना तटकरे म्हणाले की, आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि आमची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेसचे राजकीय अनुभव मोठे आहेत आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.






