NEET Protest | नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्ली येथील जंतर-मंतर (Jantar Mantar) परिसरात सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन आणखी तीव्र झाले आहे. कॉकरोच जनता पार्टीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याची स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्याचवेळी संघटनेने आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण ठेवण्याचे आवाहनही केले आहे.
राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलनकर्ते ठाम :
जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाचे प्रमुख प्रवक्ते सौरव दास (Sourav Das) यांनी बुधवारी रात्री माध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी पदाचा राजीनामा देईपर्यंत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या प्रकरणात सरकारने ठोस निर्णय घेतल्याशिवाय आंदोलन अनिश्चित काळ सुरू राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सौरव दास (Sourav Das) यांनी सांगितले की, आंदोलनाला पाठिंबा देणारे समाजसेवक सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्याशी दिवसभर अनेकदा दूरध्वनीवर चर्चा झाली. या चर्चेत आंदोलन लोकशाही मार्गाने आणि पूर्णपणे शांततेतच पुढे नेण्यावर एकमत झाले. वांगचुक यांनीही आंदोलकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच आंदोलन बदनाम करण्यासाठी किंवा हिंसाचार घडवून आणण्यासाठी समाजकंटक घुसवले जाऊ शकतात, त्यामुळे कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन सौरव दास यांनी केले.
NEET Protest | सरकारवर टीका, पोलिसांवर कारवाईचा इशारा :
केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या पत्रकार परिषदेनंतर CJP ने सरकारवर जोरदार टीका केली. गेल्या महिनाभरापासून देशभरातील विद्यार्थी रस्त्यावर आंदोलन करत असतानाही सरकार संवेदनशीलतेने वागत नसल्याचा आरोप संघटनेने केला. दुसरीकडे, जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी पेपरफुटीचे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकार संसदेत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले. मात्र, CJP ने केवळ आश्वासनांवर समाधान मानण्यास नकार देत प्रत्यक्ष कारवाई आणि धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवली आहे.
दरम्यान, बुधवारी रात्री सुमारे 8.30 वाजता टॉलस्टॉय मार्ग (Tolstoy Marg) परिसरात आंदोलनादरम्यान तणाव निर्माण झाला. काही आंदोलकांनी सुरक्षा कर्मचारी आणि दिल्ली पोलिस (Delhi Police) यांच्यावर दगडफेक तसेच पाण्याच्या बाटल्या फेकल्याची घटना घडली. या प्रकारात दोन एसीपींसह पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर CJP चे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके (Abhijit Dipke) यांनी पोलिसांच्या लाठीमारावर तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला.






