CIDCO Bharti 2025 | नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे. शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोमध्ये मोठ्या प्रमाणात मेगाभरती होणार आहे. यामध्ये तब्बल 1619 रिक्त पदे भरली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही पदे रिक्त होती, मात्र आता प्रशासनाने ही भरती 2025 मध्ये पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई परिसरात सिडकोच्या माध्यमातून मेट्रो, आंतरराष्ट्रीय विमानतळ, आणि गृहनिर्माण प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभारले जात आहेत. त्यामुळे या प्रकल्पांमध्ये मनुष्यबळाची नितांत गरज आहे. सध्या सिडकोमध्ये 2797 पदे मंजूर असून त्यापैकी 1619 पदे रिक्त आहेत, ज्यामुळे सध्याचे कर्मचारी आणि अधिकारी तणावाखाली काम करत आहेत. (CIDCO Bharti 2025)
भरती प्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात; जाहिरात लवकरच :
सिडको प्रशासनाने 2025 मध्ये बॅकलॉग भरून काढण्याचं स्पष्ट नियोजन केलं आहे. चालू वर्षात विविध संवर्गातील आवश्यक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, त्यानुसार यावर्षीच ही पदे भरली जाण्याची शक्यता आहे. भरती प्रक्रियेसाठी लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
सिडकोने यापूर्वी 160 पदांची भरती जाहीर केली होती आणि त्यासाठीची ऑनलाइन परीक्षा देखील पार पडली आहे. त्यामुळे आता या मोठ्या मेगाभरतीबाबतही कार्यवाही गतीने होणार आहे. मात्र, कोणत्या पदासाठी आणि किती जागा असतील याबाबत अजून अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. (CIDCO Bharti 2025)
CIDCO Bharti 2025 | कोणतीही शाखा, कोणताही प्रकल्प – बदली शक्य :
सिडकोच्या भरती प्रक्रियेत कोणत्याही शाखेतील उमेदवारांसाठी संधी उपलब्ध असू शकते. विविध पदांबाबतची पात्रता, अटी आणि शर्ती या लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीत स्पष्ट केल्या जातील. तसेच, सिडकोमध्ये नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांची महाराष्ट्रातील कोणत्याही प्रकल्पात बदली होऊ शकते, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
या भरतीमुळे नोकरीच्या शोधात असलेल्या हजारो तरुणांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि भरतीसंबंधित अधिसूचनांवर नियमितपणे लक्ष ठेवावे.






